महाड दुर्घटना प्रकरणी बिल्डरसह पाच जणांविरूध्द गुन्हा; बचाव कार्याला वेग

महाड । येथील तारीक गार्डन या इमारतीच्या दुर्घटने प्रकरणी बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून बचाव कार्याला वेग आला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांना वाचविण्यात यश आले आहे. अजूनही ढिगार्‍याखाली अनेक जण अडकून पडले आहेत.

महाड शहरातील काजलपुरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही इमारत काल सायंकाळी कोसळली असून यात अनेक जण ढिगार्‍याखाली दाबले गेले आहेत.. इमारत कोसळताना मोठा आवाज झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. पत्त्याची इमारत कोसळावी, तशी ही पाच माळ्यांची इमारत कोसळली. यावेळी धुराचा मोठा लोट पसरला. या दुर्घटनेत अनेकजण ढिगार्‍याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ८ जणांना वाचवण्यात यश आलं असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पुण्याहून एनडीआरएफची तीन पथके महाडकडे तातडीने रवाना झाली असून त्यांनी बचाव कार्याला प्रारंभ केला आहे. तर जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशानुसार तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड इमारत दुर्घटनेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अमित शहांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, एनडीआरएफच्या डीजींशी संवाद साधला आहे. दुर्घटनेतील लोकांना वाचवण्यासाठी शक्य तितकी मदत करण्यात येत आहे. एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी थोड्याच वेळात पोहचून लवकरच रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात होईल, सर्वाच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असं ते म्हणाले आहेत.

Protected Content