नवीदिल्ली, विशेष प्रतिनिधी | माजीमंत्री आ.एकनाथराव खडसे व खा. रक्षाताई खडसे यांनी आज (दि.२३) नवीदिल्ली येथे राज्यमंत्री श्रीपाद नाईक (स्वतंत्र प्रभार, आयुष मंत्रालय) यांची भेट घेवून मुक्ताईनगर येथे ५० खाटांचे आयुष आयुर्वेदिक हॉस्पिटल स्थापन करण्यात यावे, अशी मागणी केली.
रावेर लोकसभा क्षेत्रात जळगाव जिल्ह्यातील पाच विधानसभा क्षेत्र व बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभा क्षेत्र आहे. रावेर लोकसभा क्षेत्रातील नागरिकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. काळी व सुपीक जमीन असल्या कारणाने या भागात आयुर्वेदिक औषधी झाडांची शेती करण्यास भरपूर संधी आहे. जिल्ह्यात एकही आयुर्वेदिक हॉस्पिटल नाही. केंद्र सरकारच्या योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आयुष हॉस्पिटल स्थापन करण्याची योजना आहे. त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यात ५० खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक ती जमीन आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमिवर माजी महसूलमंत्री आ.एकनाथरावजी खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांनी ना. नाईक यांच्याकडे राष्ट्रीय आयुष योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे ५० खाटांचे आयुष आयुर्वेदिक हॉस्पिटल स्थापन करण्यात यावे, अशी मागणी केली.