जिल्हा रूग्णालयाच्या शवविच्छेदन विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि आयुवैद तज्ज्ञ डॉ.जयदीपसिंग छाबरा यांच्या संयुक्त विद्यमाने धन्वंतरी जयंतीनिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदन विभागामधील डॉक्टरांचे मदतनीस कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार अधिष्ठातांच्या दालनात करण्यात आला. 

यावेळी शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे मदतनीस कर्मचारी अनिल घेंगट, सुधीर करोसिया, भगवान चव्हाण, पवन जाधव, मनोज पथरोड यांचा विशेष सत्कार वैद्यकीय अधिकारी प्रा.डॉ.वैभव सोनार, प्रा.डॉ.संगीता गावीत, प्रशासकीय अधिकारी आर.व्ही.शिरसाठ, संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ड्रेस देवून करण्यात आला. 

कोरोनाच्या कालावधीत सुरुवातीला रुग्णाच्या मु्तदेहाला अनेक नातेवाईकांनी उचलून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे, सुद्धा टाळले. अशा वेळी शवविच्छेदन विभागातील सामान्य कर्मचाऱ्यांनी मोठ्या हिमतीने कोरोना यौद्धा म्हणून एखाद्या सैनिकासारखे ते मु्तदेह उचलून त्या संबंधितांच्या गावात अथवा जळगावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पोहचविले. त्या कर्मचाऱ्यांनी हे काम अहोरात्र केले. त्यामुळे त्यांच्या या जिकरीच्या कामाचे कौतुक मान्यवरांनी केले. या आदर्श उपक्रमाबाबत डॉ. छाबरा व संस्थेसंदर्भात डॉक्टरांनी गौरवोद्गार काढले.

उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटकातील कर्मचाऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, त्यांच्या सेवाभावाचा गौरव व्हावा, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करण्यात येतात, असे संस्थेच्या अध्यक्षा वाघ यांनी सांगितले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले.

Protected Content