काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली; खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

लखनऊ: वृत्तसंस्था । भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप लावला आहे. काँग्रेसनेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे
एका जनसभेला संबोधित करताना साक्षी महाराजांनी हा खळबळजनक आणि वादग्रस्त आरोप केला आहे. काँग्रेसने सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत पाठवलं होतं. माझा आरोप आहे की, काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेपुढे पंडित नेहरू आणि महात्मा गांधीही फिके पडत होते. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप साक्षी महाराज यांनी केला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची काल देशभरात जयंती साजरी होत होती. त्याच दरम्यान साक्षी महाराजांनी हे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. रक्त सांडवून आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं आहे. स्वातंत्र्य मागितलं आणि ब्रिटिशांनी ते दिलं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी सुभाषबाबूंना तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुँगाचा नारा द्यावा लागला. नेताजींचं हे बलिदान देश कधीच विसरू शकत नाही. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं. मात्र, इतिहासाने त्यांचं शौर्य, धाडस आणि पराक्रम दाबून ठेवण्याचं काम केलं आहे, असा दावाही त्यांनी केला.

सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैवानला जाताना विमान दुर्घटनेत झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूवरून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. २०१७ मध्ये केंद्र सरकारने आरटीआयच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला आहे. तरीही सुभाषबाबूंच्या मृत्यूवरून अनेक शंका व्यक्त केल्या जातात

Protected Content