औरंगाबाद । ओबीसी समुदायाची स्वतंत्र जनगणना व्हायलाच हवी अशी मागणी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पुन्हा जोरकसपणे केली आहे.
पंकजा मुंडे यांनी काल एका ट्विटच्या माध्यमातून आगामी जनगणना ही जातीनिहाय व्हावी अशी मागणी केली होती. यातून साहजीकच ओबीसी समुदायाच्या टक्केवारीबाबत अचूक माहिती समोर येणार असून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा मांडला होता याची पंकजांनी आठवण करून दिली होती.
यानंतर पंकजा मुंडे यांनी आज औरंगाबादमध्ये बोलतांना हा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. ओबीसींची जनगणना ही झाली पाहिजे ही भूमिका मुंडे साहेबांनी वेळोवेळी मांडली आहे, खासदार प्रीतमं मुंडेंनेही याबाबत लोकसभेत मुद्दा उचलला, आता जनगणना होणार आहे, ती होत असताना हा निर्णय झाला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल आणि आपल्याला त्या समुदायाला न्याय देणं सोपं होईल असे पंकजा म्हणाल्या.