शेंदूर्णी,प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉक डाऊन जाहीर केले. याकालावधीत जुन्या मित्रांनी सोशल मिडीया अँपचा वापर करून कुठलाही फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम न मोडता, ऑनलाईन गेट टुगेदर घडवून गर्दी न करता स्नेहाचा सुंसवाद साधला.
प्रत्येक जण शिक्षणानंतर आपल्या नोकरी व्यवसायात गुंतून जातो व आपल्या कॉलेज जीवनातील मित्र मैत्रिणीच्या भेटीला पारखा होतो. पण प्रगत तंत्रज्ञानामुळे भेटी गाठी अशक्यही नसतात हे आज आधुनीक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इच्छा शक्तीच्या जोरावर आगळे वेगळे स्नेह संमेलन घेऊन या मित्र परिवाराने दाखवून दिले आहे. पदवीधर कॉमर्स सन१९९८ ते २००१ या वर्षातील विद्यार्थ्यांचा सोशल मिडीया अँपवर व्हाट्स अँप ग्रुप होता. सहा महिन्या अगोदर या माध्यमातून सर्वांनी वेळ काढून ‘गेट टू गदर ‘ करण्याचे ठरवीले व सर्वांच्या सोईनुसार दिनांक ठरविली. मात्र, कोरोना विषाणूचा थैमान वाढल्याने शासनाने उपायात्मक म्हणून लॉक डाऊन जाहिर केला. व मैत्रीच्या स्नेहसंमेलनावर कोरोनाचे सावट आले. मात्र, सर्व मित्र मैत्रिणींनी यावर मात करण्याचे ठरवीले. डिजीटल तंत्रज्ञानाच्या साह्याने हे शक्य झाले. सर्व मित्र मैत्रिणी वीस वर्षानी एकत्र आले. या कालखंडात काही प्रिय अप्रिय घटना घडल्या काही मित्रांना काळाने हिरवून घेतले. त्यांच्या आठवणीने डोळे पाणावले. ऑनलाईन एकत्र येवून सर्वांनी मनमुराद संवाद साधला. शाळा कॉलेज जीवनातील विविध गमतीदार किस्से आठवून सर्व खळखळून हसले. प्रत्येकाने आपल्या नोकरी व्यवसाय परीवार प्रगतीची माहिती दिली तसेच भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. काही मित्रांना तांत्रिक अडचणीमुळे या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होता आले नाही. यावेळी तत्कालीन शिक्षकाबद्दल कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली .
महाविद्यालयातून शिक्षण घेऊन केवळ विद्यार्थी म्हणून बाहेर न पडता स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तुत्व संपन्न नागरिक म्हणून ही मित्र मंडळी जीवन जगत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी मोठे उद्योजक, व्यापारी आहेत. काही बडे राजकारणी किंगमेकर, शिक्षक, प्राध्यापक, यशस्वी शेतकरी, समाजसेवक, पत्रकार, नोकरदार आहेत तर अनेक माजी विद्यार्थिनी यशस्वी उद्योजिका, समाजसेविका त्याच प्रमाणे आदर्श गृहिणी आहेत. नियोजित तारखेस झूम अॅपच्या साह्याने जामनेर, पुणे, मुंबई, सुरत, बीड, अमरावती, जळगाव, भुसावळ, शिरपूर, नागपूर, कोल्हापूर, शेंदुर्णी, फत्तेपूर येथील सर्व मित्र मैत्रिणींनी संवाद साधला.