खडसेंवर थेट काऊंटर अॅटक करा ; दिल्लीतून निर्देश?

 

जळगाव (प्रतिनिधी) विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर पुन्हा एकदा मागील काही दिवसांपासून एकनाथराव खडसेंनी मनातील खदखद व्यक्त करायला सुरुवात केली आहे. परंतु यावेळी खडसेंनी केलेली टीका भाजपच्या भलतीच जिव्हारी लागलीय. त्यामुळे खडसेंवर त्यांच्याच पद्धतीने थेट काऊंटर अॅटक करा, असे निर्देश दिल्लीतून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, दुसरीकडे खडसेंच्या घरात खासदारकी असून पत्नीलाही सहकारातील मोठे पद देण्यात आले आहे. तर विधानसभेसाठी मुलीला तिकिट दिले होते. एखाद्या मुद्यात ऐकले नाही तर बिघडते काय ? असे प्रतिउत्तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना दिले आहे.

 

 

एकनाथराव खडसे यांनी मागील दोन दिवसापासून विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्या पासून आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त करायला सुरुवात केली आहे. आधीच्या कालखंडात आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेत होतो. परंतू आता एकदोन जण निर्णय घेत आहे. पक्षश्रेष्ठींचे समर्थन असल्यामुळे काही जण आम्हीच पक्षाचे मालक असून हुकुमशाहा असल्याप्रमाणे वागताय. आता भाजपात लोकशाही राहिलेली नाही, अशी स्फोटक प्रतिक्रिया दिली होती. नेमकी हीच टीका दिल्लीतील नेत्यांची नाराजी मोठ्या प्रमाणात वाढवून गेली. त्यामुळे दिल्लीवरून जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना खडसेंवर थेट काऊंटर अॅटक करण्याच्या सक्त निर्देश देण्यात आल्याचे वृत्त आहेत. दुसरीकडे नाथाभाऊ हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून पक्ष वाढीत त्यांचा मोलाचा वाटा असला तरी पक्षाने त्यांना आजवर बरेच काही दिले असल्याची प्रतिउत्तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना दिले आहे. अगदी नाथाभाऊंनी पक्ष वाढीसाठी नक्कीच प्रयत्न केले. तथापि, त्यांना पक्षाने महत्वाची पदे देखील दिली. त्यांच्या घरात खासदारकी असून पत्नीलाही सहकारातील मोठे पद देण्यात आले आहे. तर विधानसभेसाठी मुलीला तिकिट दिले होते. यामुळे आजवर पक्षाने खडसे यांचे ऐकले असेल तर एखाद्या मुद्यात ऐकले नाही तर बिघडते काय ? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील कोणते नेते खडसेंविरुद्ध बोलतात? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content