ऑक्सिजन तुटवड्यामुळे ७ दिवस झोपू शकलो नाही – शिवराजसिंह

 

भोपाळ : वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात ऑक्सिजन तुटवड्यामुळे  ७ दिवस झोपू शकलो नाही , असा अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितला

 

देशात दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत देशात ऑक्सिजनचा भयंकर तुटवडा जाणवू लागला होता.काही भागांमध्ये ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचे प्राण गेल्याच्या देखील दुर्दैवी घटना समोर आल्या होत्या. हे प्रकरण थेट दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं होतं. अनेक न्यायालयांनी स्थानिक राज्य सरकारांची देखील कानउघाडणी केल्यानंतर हळूहळू ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊ लागला. मात्र, या कालावधीमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशाची आरोग्य व्यवस्था आणि आपातकालीन परिस्थितीत प्रतिसाद देणारी यंत्रणा यातल्या त्रुटी मोठ्या प्रमाणावर उघड झाल्या.

 

दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भातला एक अनुभव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी रात्री सांगितला. “मला हे सांगायला आता काहीही वाटत नाही की राज्यात जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता, तेव्हा मी ७ दिवस क्षणभर देखील झोपू शकलो नाही. माझ्याकडे माहिती यायची की अमुक एका हॉस्पिटलमध्ये पुढच्या ३० मिनिटांमध्ये ऑक्सिजन संपणार आहे. मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचो. मी स्वत: ऑक्सिजन टँकरच्या चालकांशी फोनवर बोलायचो. ते नेमके कुठपर्यंत पोहोचलेत, किती वेळ लागेल वगैरे माहिती घ्यायचो”, असं चौहान म्हणाले आहेत.

 

यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी सर्वच लोकांना संदेश दिला आहे. “लोकांना हे समजायला हवं की संकट अद्याप ओसरलेलं नाही. आजघडीला राज्यात रोज तब्बल ८० हजार चाचण्या केल्या जात आहेत. जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता, तेव्हा राज्य सरकारने आरोग्य सुविधा आणि लस तुटवडा देखील सुधारण्यासाठी प्रयत्न केले. अधिकारी वर्गाने देखील महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवायला हवी. तुलनेनं महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळत आहेत”, असं देखील शिवराजसिंह चौहान म्हणाले.

 

Protected Content