जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकासमोर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या कामबंद संपाला शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एस.टी.चा आजपासून १०० टक्के बंद असल्यामुळे बसस्थानकाच्या आवारात शुकशुकाट दिसून आला.
याबाबत माहिती अशी की, विविध संघटनांच्या माध्यमातून अचानक रविवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेपासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह अन्य मागण्यांकरीता पुन्हा संपाला सुरू करण्यात आली. या संपात यावल एसटी महामंडळाचे ५०० हून अधिक विविध पदावरील आगारातील कर्मचारी यात सहभागी झाले आहे. सर्व कर्मचारी दुपारपासुन अचानक राज्यव्यापी संपात सहभागी झाल्याने जळगाव बसस्थानकाच्या आवारात सोमवारी शुकशुकाट पहावयाला मिळाला. तर बसस्थानका समोर सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट देवून चर्चा केली. कामबंद संपात कोणत्याही प्रकारचे नुकसान केले जाणार नाही अशी ग्वाही संपात सहभागी झालेले एसटीचे कर्मचारी यांनी दिली आहे.