…तर भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करीन ; गुलाबराव पाटलांचं जाहीर आव्हान

 

जळगाव : प्रतिनिधी । “गिरीशभाऊंना सल्ला आहे. पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांनी गिरीशभाऊंना स्टेजवर बोलावलं होतं. त्याचा काही प्रभाव  असेल, तर जास्तीतजास्त लस जळगाव आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी आणावी. आवश्यक तो लसीचा साठा महाराष्ट्रासाठी त्यांनी  मिळवून दिला, तर त्यांचा मी भर चौकामध्ये सत्कार करीन”, असं जाहीर आव्हान पालकमंत्री व शिवसेना प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजनांना दिलं आहे.

 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा आमदार गिरीश महाजन यांच्यावर परखड शब्दांत टीका केली होती. त्यांच्या एका व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दोन्ही नेत्यांमध्ये सुंदोपसुंदी झाली होती. आता पुन्हा गिरीश महाजन यांच्यावर महाविकासआघाडीतल्या नेत्यानं म्हणजे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी  निशाणा साधला आहे. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी राज्यातल्या लसीकरणावरून गिरीश महाजन यांना सुनावलं आहे.

 

राज्यात सुरू असलेला लसीकरणाचा कार्यक्रम आणि उपलब्ध होणारा लसीचा साठा या मुद्द्यावरूनदेखील गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. “राज्य सरकार पूर्ण लसी घ्यायला तयार असेल, तर लस देण्याचा अधिकार कुणाला आहे हे मी सांगण्यापेक्षा गिरीशभाऊंना चांगलं माहिती आहे. राजकारण कोण करतंय हे गिरीशभाऊंना माहिती आहे. लसी पूर्ण उपलब्ध असल्या, तर महाराष्ट्र सरकारची आरोग्य यंत्रणा एवढी सज्ज आहे की दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण राज्याला लसीकरण करू शकते.जोपर्यंत लसीकरणाचा कोटा आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत इथे परमेश्वर जरी आला, तरी लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही”, असं ते म्हणाले.

 

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये एका मुलाने गावात पाणी नसून आमदार गिरीश महाजन माझा फोन उचलत नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर खडसेंनी “बरोबर आहे, तो फक्त मुलींचेच फोन उचलतो”, असं विधान केलं होत

 

यावर गिरीश महाजन यांनी “मी त्यासाठी एकनाथ खडसेंना दोष देणार नाही. कारण वाढतं वय, इतके आजार आणि त्यात जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता, त्याला आज आमदारकीही मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं झालंय असं मला वाटतंय”, असा पलटवार केला होता. त्यावर खडसेंनीही “गिरीशभाऊंना मी आत्ता ओळखत नाहीये. १९९४-९५ मध्ये फर्दापूरला अशाच प्रकारची घटना घडली होती. तेव्हापासून आजतागायत सगळा इतिहास मला माहितीये आणि सगळ्या जनतेलाही माहिती आहे”, असं म्हणत गिरीश महाजनांवर प्रतिहल्ला केला होता.

Protected Content