मुंबई (वृत्तसंस्था) अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर करोना महामारीशी लढा देण्यास महत्त्वाची भूमिका निभावत असून एमडी/एमएसच्या परीक्षा डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्यासंबंधी आपण मध्यस्थी करत भारतीय मेडिकल काऊन्सिलला आदेश द्यावेत, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, परीक्षा द्यावी लागणारे अंतिम वर्षाचे निवासी डॉक्टर सध्या राज्य सरकार आणि महापालिका मेडिकल कॉलेजमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय व्यवस्थेला मदत करत आहेत. जर वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पडली तर या कठीण काळात प्रशिक्षित डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासेल, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रातून सुपर स्पेशलिटी (डीएम/एमसीएच) यांची प्रवेश परीक्षाही डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.