मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहे त्यामुळे त्यांचा योग्य सन्मान होईल असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि वंचित यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत असेही राऊतांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी राऊत म्हणाले, ”वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची आधीच युती झाली आहे. ती युती असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्यात काँग्रेस राष्ट्रवादीची कुठलीही हरकत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचेच नेते नाहीत. तर या देशातील वंचित समाजाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी महाराष्ट्रात अतिशय सन्मानाने चर्चा होत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ”एकनाथ शिंदे एवढा आत्मविश्वास कुठून आणतात, ते पहावं लागेल. निवडणुका सहा महिन्यांवर आल्या आहेत विधानसभा निवडणुका हे घेणार नाहीत का? अजून मुख्यमंत्री नेमण्याची संविधानाने तरतूद केलेली नाही. सहा जानेवारीला काय निकाल लागतो, यावर अख्या देशाचे लक्ष लागलेले आहे. ते घटनाबाह्य पद्धतीने मुख्यमंत्री झाले. देशाचे सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग हे घटनाबाह्य सरकारला अप्रत्यक्षपणे पाठबळ देत आहे, हे लोकशाहीचे दुर्दैव आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
यावेळी अदानी प्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. या देशात सत्याचा विजय होतो म्हणजे अदानींचा विजय होतो, असा टोला राऊतांनी लगावला. तसेच जो न्याय अदानी यांना मिळतो तो न्याय या देशातील नागरिकांना कायदाप्रिय जनतेला का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
”पंडित नेहरूंपासून पुढली 50 वर्ष या देशामध्ये ज्ञान, विज्ञान, शिक्षण अंतराळामध्ये प्रचंड प्रगती केली. पण आत्ताचे जे काही राज्यकर्ते आहेत ते या देशाला पाच हजार वर्ष मागे घेवून जात आहेत. त्यांच्या विचाराला आधुनिकतेची जोड नाही हे त्यामागचे कारण आहे. अजूनही ते कुठल्या चिखलात लोळावे अशा पद्धतीने राज्य करत आहेत. त्यामुळेच देशात दहा वर्षापासून बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, महागाई वाढत आहे”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.