रांची : वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणूक २०२० ची रणधुमाळी सुरू असताना . चारा घोटाळ्यात राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चाईबासा खटल्यात जामीन मंजूर करण्यात आला . परंतु, आत्ताच लालूंना तुरुंगातून बाहेर पडता येणार नाही. कारण दुमका ट्रेझरी प्रकरणाची सुनावणी अद्याप बाकी आहे.
चाईबासा ट्रेझरी प्रकरणात अर्धी शिक्षा पूर्ण केलेल्या लालू प्रसाद यादव यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. गेल्या सुनावणीत सीबीआयनं अद्याप अर्धी शिक्षी पूर्ण होण्यात २६ दिवस बाकी असल्याचं कारण दिलं होतं.
दुमका प्रकरणात मात्र अद्याप लालूंना जामीन मंजूर झालेला नाही. नोव्हेंबरमध्ये दुमका प्रकरणातही लालू यादव यांची अर्धी शिक्षा पूर्ण होणार आहे. त्यामुळे, लालू प्रसाद यादव नोव्हेंबर महिन्यात तुरुंगाबाहेर येऊ शकतात, अशी आशा त्यांच्या वकिलांनी व्यक्त केलीय.
यापूर्वी लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील तीन इतर प्रकरणांत जामीन मंजूर करण्यात आलाय. लालू प्रसाद यादव रांचीच्या रिम्स रुग्णालयात आहेत. या अगोदर ते रिम्सच्या पेईंग वॉर्डमध्ये राहत होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना डायरेक्टर बंगल्यात हलवण्यात आलंय.