अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महायुतीतील नेत्यांना अनेक धक्के देत आहेत. आता शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का दिला असलेली चर्चा सुरू झाली आहे. कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे हे शरद पवार यांची तुतारी हाती घेणार असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. कोल्हे कुटुंबाचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठे वर्चस्व मानले जाते. विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत.
अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आहेत. ते महायुतीत असल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते विवेक कोल्हे यांना उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे विवेक कोल्हे अडचणीत सापडले आहे. अशातच शरद पवारांनी खेळी करून विवेक कोल्हे यांना आपल्या पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे. अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे. अशातच विवेक कोल्हे यांची शरद पवारांसोबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या वेळी भेट झाली आहे.