मुंबई : महाराष्ट्र सरकारनं यावर्षी ई-पीक पाहणी अ्ॅप सुरु केलं असून यात अनेक ठिकाणी अडचणी येत असल्यामुळे शेतकर्यांना याची सक्ती करू नये अशी मागणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी करण्याची सुरुवात १५ ऑगस्टला झाली होती. याला मध्यंतरी मुदतवाढ सुध्दा देण्यात आलेली आहे.
याला आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विरोध दर्शविला आहे. ई-पीक पाहणी कार्यक्रमाची शेतकर्यांवर सक्ती करु नये, अशी भूमिका घेतली आहे. पीक पाहणी कार्यक्रम शासकीय यंत्रणांकडूनचं राबवावा, अशी मागणी करणारं पत्र बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
बच्चू कडू यांनी या पत्रात म्हटले आहे की, राज्यात सदस्यस्थितीत शेतकर्यांनी शेतात लावलेल्या पिकांची पीक पाहणी करण्याकरिता ई-पीक पाहणी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकर्यांच्या शेताचा सर्व्हे, गट नं. एकूण क्षेत्र, पोटखराब क्षेत्र, शेतातील पिके यांची माहिती ई- पीक पाहणी सॉफ्टवेअरमध्ये शेतकर्यांनीच स्वत: भरुन व फोटो अपलोड करणे बंधनकार करण्यात आलं आहे. मात्र, आजमितीला राज्यातील शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक शेतकरी कुटुंबामध्ये अ्ॅण्ड्राईड फोन नाहीत, असल्यास साधे व केवळ बोलण्यापुरते फोन आहेत. काहीकंडे अ्ॅण्ड्रॉईड फोन असल्यास त्यामध्ये इंटरनेटचा बॅलन्स नाही, सॉफ्टवेअरसाठी लागणारी आवश्यक स्पेस नाही, अशी परिस्थिती आहे. राज्यातील प्रत्येक गावात व खे़डोपाडी इंटरनेट सेवेसंदर्भात अडचणी आहेत. त्यामुळे गरीब आणि अर्धशिक्षिक तसेच सामान्य शेतकरी बांधवांसाठी ई-पीक पाहणी कार्यक्रम डोकेदुखी ठरत आहे.
राज्यातील शेतजमिनी व त्यामधील पिकं यांची पाहणी करणं, आवश्यक नोंदी ठेवणं, या साठी कृषी विभाग व महसूल विभाग शासनाच्या यंत्रणा अस्तित्वात असताना ई पीक पाहणी कार्यक्रम अंमलबजावणी सामान्य शेतकर्याकंडून करवून घेणं चुकीचं व अन्यायकारक असल्याचं बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सर्व बाबींचा विचार करुन ई-पीक पाहणी कार्यकमात शेतकर्यांकडून माहिती भरून सक्ती न करता पूर्वीप्रमाणं चालत आलेल्या पद्धतीप्रमाणं पीक पाहणी कार्यक्रम शासकीय यंत्रणांकडून राबवा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.