ओबीसी आरक्षणासाठी उद्या भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

नागपूर प्रतिनिधी | ओबीसी आरक्षणाचा मागणीसाठी उद्या राज्यभरात भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा आज पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र केले. ते म्हणाले की, ओबीसींना आरक्षण मिळालं नाही यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून सरकारमधील झारीतले शुक्राचार्य जबाबदार आहेत. कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधी आणि न्याय विभागाने व्यवस्थित बाजू न मांडल्याने आरक्षण गेल्याचं सांगितलं. हा विभाग कुणाकडे आहे हे सर्वांना माहीत आहे, असं सांगतााच राज्य सरकार विरोधात उद्या भाजप राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरात एक हजार ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जोपर्यंत ओबीसींना न्याय मिळत नाही. तोपर्यंत भाजप आंदोलन करतच राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.

किमान सहा जिल्ह्याचा डाटा तयार केला असता तर तिथे आरक्षण देता आलं असतं. सहा महिन्यात राज्य सरकारने काय केलं? हे सर्वोच्च न्यायालयाने विचारलं. पण राज्य सरकारने काहीही केलं नाही. ओबीसी आयोगाचा प्रस्ताव आल्यानंतर मुख्य सचिवाने एकही बैठक घेतली नाही. मुख्य सचिवांवर बैठक न घेण्याबाबत दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांना छोटं खातं देऊन या सरकारने त्यांची गोची केली आहे. ओबीसी मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी ढकलण्याचा डाव आहे. मुख्यमंत्री काहीही करत नाही. कॉंग्रेसवर ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.

Protected Content