जळगाव, प्रतिनिधी । काल जामनेर येथे सामान्य रुग्णालयात कोरोना बाधित व्यक्तीचा तब्बल साडेतीन तास उलटून सुध्दा वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. काल घटना घडल्यानंतर घटनास्थळी येत आमदार गिरीश महाजन यांनी स्वतः चे अपयश लपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला घटनेबद्दल जबाबदार धरत संताप व्यक्त केला यावर एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी टिका केली आहे.
एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीला महा विकास आघाडी सरकारला जबाबदार धरण्याचे काम व हेतुपुरस्कर जिल्हा प्रशासनाच्या कामांमध्ये आडकाठी बनण्याचे काम माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेले आहे व मोठमोठ्या डिंग्या हाणण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. गेल्या तीस वर्षांपासून गिरीश महाजन जामनेर विधानसभेचे आमदार आहेत. मागील पाच वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जामनेर नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सुद्धा घरातच इतकं सर्व गेल्या तीस वर्षांपासून असतानादेखील आजपर्यंत जामनेर येथील सामान्य रुग्णालयाला साधी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देता आलेली नाही व त्यामुळेच आज सर्वसामान्यांना म्हणण्याची वेळ येते आहे कि, “लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी अवस्था आ. गिरीश महाजन यांची झाली आहे. स्वतःच्या मतदारसंघात व मतदारसंघातील नागरिकांसाठी साधी रुग्णवाहिका देखील आजपर्यंत इतके पदे भोगल्यानंतर सुद्धा उपलब्ध करून देता आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा एनएसयूआयने माजी पालकमंत्री व आमदार महाजन यांनी आधी आपल्या मतदार संघातील नागरिकांची काळजी व जबाबदारी घेण्यात सक्षम व्हा आणि नंतरच इतरांवर ती दगड फेकावा अशी सूचना करण्यात आली आहे. भाजप सरकारच्या काळामध्ये पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना जर जळगाव जिल्ह्यासाठी सक्षमपणे काम केले असते तर आज जळगाव जिल्ह्याची कोरोणामधील परिस्थिती ही इतकी टोकाला गेली नसती. परंतु फक्त आणि फक्त मोठमोठ्या गोष्टी कराव्यात आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात साधे व्हेंटिलेटरची सुद्धा सोय मागील पाच वर्षात माजी पालकमंत्री यांना करता आली नाही. जामनेर शहरात त्यांना सामान्य रुग्णालयासाठी एक साधी रुग्ण वाहिका देखील उपलब्ध करून देता आलेली नाही हे त्याहीपेक्षा मोठं दुर्दैव नसल्याचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी म्हटले आहे.