शेताच्या बांधावरून दोन भावांवर प्राणघातक हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेताचा बांध काढल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून दोन्ही भावांना ट्रॅक्टरच्या लोखंडी टॉमी व कुऱ्हाडीने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून याबाबत रविवार १९ जून रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गजेंद्र नामदेव सपके (वय-३९) रा. पिंचर्डे ता. भडगाव जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे भडगाव तालुक्यातील पिचर्डे शिवारात गट नंबर २०८/२ येथे शेत आहे. त्यांच्या शेताला लागून गोकूळ सिताराम पाटील व जितेंद्र सिताराम पाटील यांचे शेत आहे. ११ जून रोजी दुपारी गजेंद्र सपके व त्याचा भाऊ प्रकाश नामदेव सपके हे शेतात काम करत होते. त्यावेळी गोकूळ पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने शेतातील बांध फोडला. याचा जाब विचारला असता हा बांध आमचा वडीलोपार्जीत आहे असे सांगून शिवीगाळ केली व ट्रॅक्टरच्या लोखंडी टॉमी व कुऱ्हाडीने गजेंद्र सपके व त्याचा भाऊ प्रकाश सपके यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. दोघांना खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. रविवारी १९ जून रोजी गजेंद्र नामदेव सपके यांनी दिलेल्या जबाबावरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गोकूळ सिताराम पाटील व जितेंद्र सिताराम पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content