आर टी लेले विद्यालयाच्या लिपिकाला मिळाली 38 वर्षानंतर स्व मालकीची जमीन

पहूर ता.जामनेर, वार्ताहर । सन १९८४ साली मुलीच्या लग्नासाठी बापाने आपल्या जिवलग मित्राकडे आपली तीन एकर जमीन १० हजार रुपयांना गहाण ठेऊन. लग्न थाटामाटात पार पडलं. दिवस जाऊ लागले, आणि या व्यवहाराचा सर्वांना विसरही पडला. जवळजवळ ३८ वर्षांनी बापाला आपल्या या जमिनीची आठवण झाली, आणि आपल्या डॉक्टर मुलाजवळ हा विषय काढला . डॉक्टर मुलगा वडिलांच्या मित्राच्या मुलाजवळ, जे पहूर कसबेचे माजी सरपंच तर आज सरपंचपती आहे, त्यांना भेटून या व्यवहाराची माहिती दिली.

आता, सरपंचपती असलेला मुलगा नेमकी काय भूमिका घेणार यावर या कथेचा शेवट अवलंबून आहे. शेवटी संरपंचपती मुलगा आपल्या वडिलांच्या मित्राला भेटले आणि त्या काळी वडीलांनी गहाण म्हणून घेतलेली जमीन त्यांना त्याच भावात परत करून आपल्या प्रामाणिकपणाची छाप सोडून जातो. अगदी चित्रपटाचा वाटावा असा हा क्षण काल्पनिक नसून, ही सत्य घटना आहे ‘जामनेर तालुक्यातील पहूर कसबे’ या गावातील आर टी लेले विद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक ‘सुधाकर बोरसे’ आणि त्यांचे जिवलग मित्र ‘दगडू जाधव’ यांच्या परिवाराची.

पहूर येथील आर. टी. लेले विद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक सुधाकर गणेश बोरसे (वय ८४ यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी १९८४ मध्ये, आपले जिवलग मित्र दगडू जाधव यांच्याकडे दहा हजार रुपयांना आपल्या मालकीची तीन एकर जमीन गहाण ठेवली होती. कालांतराने या व्यवहाराचा दोघांनाही विसर पडला. मात्र अचानक २०२१ मध्ये कोरोना काळात या घटनेची सेवानिवृत्त लिपिक सुधाकर बोरसे यांना आठवण झाली; आणि त्यांनी हा विषय आपल्या मुलाला, डॉ. दिनेश बोरसे यांना बोलून दाखवला.

डॉ. दिनेश बोरसे यांनी या व्यवहाराची माहिती वडिलांची मित्र दगडू जाधव यांच्या मुलाला दिली. दगडू जाधव यांचे चिरंजीव शंकर जाधव हे आजच्या घडीला पहूर कसबे गावाचे माजी सरपंच असून आज सरपंचपती आहेत. या व्यवहाराची माहिती शंकर जाधव यांना दिल्यावर शंकर जाधव यांनी या विषयासंदर्भात सुधाकर बोरसे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. या व्यवहाराची सरपंचपती शंकर जाधव यांनी सेवानिवृत्त लिपीक सुधाकर बोरसे यांच्याशी चर्चा केली; आणि कोणताही स्वार्थ न दाखवता सामाजिक कार्यकर्ते युवराज जाधव यांच्या माध्यमातून सुधाकर बोरसे यांची तीन एकर जमीन त्याच भावात त्यांना परत केली.

आजच्या काळात निव्वळ स्वार्थासाठी लुटीचा धंदा करणाऱ्या या जगात, सरपंच शंकर दगडू जाधव यांनी कोणताही मध्यस्थी न ठेवता, आपल्या प्रामाणिकपणाचा बडेजाव अथवा गाव दवंडी न पिटवता बोरसे परिवाराची हक्काची असलेली तीन एकर जमीन त्यांना परत केली. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही परिस्थिती आजच्या काळात माणुसकीचा झरा आजही प्रांजळपणे वाहत असल्याचे दाखवून देते. सरपंच शंकर जाधव यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. एकीकडे ‘माणुसकी हरवली’ असं म्हटले जात असताना पहुर कसबे गावात मात्र सरपंच शंकर जाधव यांनी आपल्या प्रमाणिकपणाचा आदर्शच गावसमोर ठेवला आहे.

Protected Content