आरटीजीएस आता अखंड आणि २४ तास !

मुंबई : वृत्तसंस्था । मोठ्या आर्थिक हस्तांतरासाठीची ‘आरटीजीएस’ ऑनलाइन बॅंकिंग सेवा डिसेंबरपासून आठवड्याचे सातही दिवस २४ तास उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना तसेच संस्थांना डिसेंबरपासून कधीही कोणत्याही क्षणी मोठी रक्कम ‘आरटीजीएस’ ने पाठवता येईल.

याआधी ‘एनईएफटी’ व्यवहार २४ तास उपलब्ध होते. नोटाबंदीनंतर रोकड व्यवहारांऐवजी ग्राहकांनी ऑनलाईन बॅंकिंग व्यवहारांना पसंती दिली होती. त्यानंतर बाजारातील रोख व्यवहारांमध्ये वाढ होत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या निदर्शनात आले होते. त्यानंतर आरबीआयने डिजिटल बॅंकिंगला प्रोत्साहन देत ‘एनईएफटी’ सेवा २४ तास उपलब्ध केली. आज ‘आरटीजीएस’देखील डिसेंबरपासून आठवड्याचे सातही दिवस २४ तास उपलब्ध करण्याची घोषणा केली.

सध्या ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून ग्राहकाला बँकिंग कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत व्यवहार करता येतात. दुसरा आणि चौथा शनिवारी ही सेवा उपलब्ध होत नाही.

‘आरटीजीएस’च्या माध्यमातून ग्राहकाला एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येते. एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत आर्थिक हस्तांतरण होताना वास्तविक वेळेत व्यवहार होतात. रिझर्व्ह बॅंकेने ठरवून दिलेल्या वेळेतच अशा प्रकारचे व्यवहार पूर्ण होतात. नेटबॅंकिंग करत असाल तर बॅंकेत न जाता ग्राहक आरटीजीएसचा पर्याय वापरून ज्यांना पैसे हस्तांतर करायचे आहेत त्या व्यक्तीचा खाते क्रमांक, बॅंक कोड देऊन पैसे पाठवता येतात.

या प्रणालीत वेळेनुसार शुल्क वाढत जाते. ज्यात सकाळच्या सत्रात कमी शुल्क असते नंतर ते तासागणीक वाढत जाते. किमान २ लाख रुपये ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून पाठवता येतात. पैसे पाठवण्याची कमाल मर्यादा नाही मात्र बँकांकडून १० लाखांपर्यंत हस्तांतर करण्यास परवानगी आहे.

पैसे खात्यात जमा झाल्यास त्यावर शुल्क नाही. पैसे पाठवणाऱ्याला शुल्क भरावे लागते. दोन ते पाच लाखांपर्यंत २४.५० रुपये अधिक कर व पाच लाखांहून अधिक रकमेवर ४९.५० रुपये अधिक कर भरावे लागतात .

‘एनईएफटी’मध्ये देशातील कोणत्याही बॅंकेच्या शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला कोणत्याही बॅंकेच्या शाखेतून इलेक्‍ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करता येतात. ही सेवा १६ डिसेंबर २०१९ पासून २४ तास उपलब्ध करण्यात आली. ही सेवा निशुल्क आहे. एनईएफटी सुविधा ६३ हजार बॅंकांद्वारे संपूर्ण देशभर तसेच नेपाळला देखील पुरवली जाते. क्रेडिट कार्डवरील रकमेच्या पेमेंटसाठी देखील याचा वापर केला जातो. एका बॅंक खात्यातून दुसऱ्या बॅंक खात्यात हस्तांतरित केलेली रक्कम दोन तासांच्या आत लाभार्थीच्या खात्यात जमा केली जाते.

Protected Content