पालकांनी अपप्रचाराला बळी न पडता सहकार्य द्यावे – भारती महाजन ( व्हिडीओ )

सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मेडियम स्कूलच्या पालकांना पाल्यांची फी भरण्यासाठी आधीच सवलत देण्यात आली असून त्यांच्या समस्या समजून घेत फी वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे कुणीही खोडसाळपणाच्या अपप्रचाराला बळी न पडता शाळेच्या व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आवाहन या शाळेच्या प्राचार्या सौ. भारती महाजन यांनी केले आहे. शाळेबाबत सुरू असणार्‍या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमिवर त्या लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होत्या.

याबाबत वृत्त असे की सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लीश मेडियम स्कूलबाबत अलीकडच्या काळात सोशल मीडियातून चर्वण सुरू झाले आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे शाळेच्या प्राचार्या सौ. भारती महाजन यांच्यासह काही पालकांना बोलते केले असता यातील दुसरी बाजू देखील समोर आली.

या संदर्भात बोलतांना प्राचार्या सौ. भारती महाजन म्हणाल्या की, आमच्या शाळेची फी ही दोन वर्षांपासून वाढविण्यात आलेली नाही. यातच यंदा कोरोनाच्या आपत्तीमुळे ऑनलाईन अभ्यास सुरू करण्यात आला असून पालकांना फी भरण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. यात पालकांच्या देखील अडचणी लक्षात घेऊन त्यांना हव्या त्या टप्प्यांमध्ये फी भरण्याची सवलत देण्यात आलेली आहे. यामुळे अनेक पालक अगदी हजार रूपये महिना या प्रमाणे सुध्दा फी भरत आहेत. यामुळे शाळेतर्फे फी भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचा आरोप चुकीचा आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पालकांकडून फक्त ट्युशन फी घेतली जात असून स्कूल बससह अन्य आकारणी करण्यात येत नाही.

सौ. भारती महाजन पुढे म्हणाल्या की, सध्या ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असले तरी बहुतांश शिक्षक हे शाळेत येऊनच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. यामुळे शाळा ही त्यांच्यासाठी सुरू झालेली असून यात ते सर्व उपलब्ध सुविधांचा वापर करत आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अडचणीत येऊ नये यासाठी शाळा प्रशासन प्रयत्नशील असून सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे असे त्या म्हणाल्या. या प्रकरणी काही जण अपप्रचार करत असून याला कुणी बळू पडू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

दरम्यान, या प्रसंगी प्रस्तुत प्रतिनिधीने काही पालकांशी सुध्दा वार्तालाप केला. यात बहुतेक जणांनी कोरोनामुळे सर्वच जण अडचणीत आले असले तरी यातून मार्ग काढावाच लागेल असे प्रतिपादन केले. यामुळे सर्वांच्या अडचणी लक्षात घेऊन व्यवस्थापन वाटचाल करत असल्याने सहकार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन बहुतेक पालकांनी केले.

खालील व्हिडीओत पहा याबाबतचा विशेष वृत्तांत.

Protected Content