आयकर खात्याच्या गुप्त कामगिरीत २५६ करोडपती चाट विक्रेते , टपरीवाले सापडले !

 

 

नवी दिल्ली  :  वृत्तसंस्था  । बिग डेटा सॉफ्टवेअर, आयकर विभाग आणि जीएसटी नोंदणीच्या तपासणीत रोडच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची गाडी लावून व्यवसाय करणारे २५६ जण करोडपती निघाले आहेत.

कानपूरमध्ये रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोस्याची गाडी लावणारे विक्रेते कोटींमध्ये खेळत आहेत, हे ऐकून आपणही थक्क व्हाल. मात्र यावर विश्वास ठेवावा लागेल. गल्ली बोळात छोटे-छोटे दुकानांचे मालक, किराणा मालाचे दुकानदार, औषध विक्रेते करोडपती आहेत. फळ विक्रेत्यांकडेही शेकडो बीघा शेतजमीन आहेत. आपल्याकडे फक्त एक कार असू शकते परंतु यांच्याजवळ तीन-तीन कार आहेत. परंतु हे ना आयकर भरतात ना जीएसटीच्या नावावर एक पैसा देतात. 

दिसायला गरीब दिसणाऱ्या या धनदांडग्यांवर आयकर विभाग गुप्त नजर ठेऊन होता. केवळ आयकर भरणा आणि परतावा भरणाऱ्या करदात्यांची देखरेख करण्याशिवाय, विभाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे कमवणाऱ्या अशा व्यापाऱ्यांचा डेटाही सतत गोळा करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गुप्त करोडपतींना पकडण्यास त्यांनी सुरवात केली आहे.

जीएसटी नोंदणी बाहेरील या व्यापाऱ्यांनी एक पैसाही कर भरला नाही. परंतु चार वर्षात ३७५ कोटींची मालमत्ता विकत घेतली. ही मालमत्ता  अत्यंत महागड्या व्यावसायिक भागात खरेदी केल्या गेली.दक्षिण कानपूरमध्ये निवासी जमीन खरेदी केली.  ३० कोटींपेक्षा जास्त किंमतीची केव्हीपी खरेदी केली. ते ६५० बीघा शेतजमिनीचे मालक देखील बनले. ग्रामीण भागात  त्यांनी  जमिनी खरेदी केल्या आहेत.

कोरोना काळात आर्यनगरमधील दोन, स्वरूप नगरमधील एक आणि बिरणा रोडमधील दोन पान दुकानांच्या मालकांनी पाच कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे. मालरोड रोडवर खस्ता विकणारा वेगवेगळ्या गाड्यांवर दरमहा १.२५ लाख रुपये भाडे देत आहे. स्वरूप नगर, हुलागंज येथील दोन रहिवाशांनी दोन इमारती खरेदी केल्या. लालबंगला येथील एक आणि बेकणगंज येथील दोघांनी दोन वर्षात तीन मालमत्ता खरेदी केल्या आहेत, ज्यांचे बाजार मूल्य १० कोटींपेक्षा जास्त आहे. बिरहाना रोड, मॉल रोड, पी रोडच्या चाट व्यापाऱ्यांनी जमिनीवर बरीच गुंतवणूक केली. जीएसटी नोंदणीबाहेरील किरकोळ व्यापारी आणि औषध विक्रेत्यांची संख्या ६५ पेक्षा जास्त आहे ज्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा बरेच उत्पन्न वाढते तेव्हा प्रत्येक माणूस गुंतवणूकीचा मार्ग शोधत असतो. फेरीवाले, पान ठेल्यावाल्यांची जीवनशैली अतीशय साधी असते त्यामुळे त्यांचा खर्च मर्यादीत असतो आणि बचत जास्त असते. हा पैसा कोणत्याही विभागाच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यांनी चलाकी दाखविली. विभागाच्या नजरेतून वाचण्यासाठी त्यांनी सहकारी बँकेत खाते उघडले. या मालमत्तेत बहुतांश गुंतवणूक भाऊ, मेव्हणी, काका, मामा आणि बहीण यांच्या नावावर केली गेली आहे. परंतु पॅनकार्ड स्वत:चे जोडले. केवळ एकाच मालमत्तेत पॅनकार्ड आणि आधार मिळताच त्यांचा भांडाफोड झाला आहे.

 

Protected Content