मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेच्या आमदारांच्या आपआपल्या मतदारसंघानुसार अनेक मागण्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदारांच्या या मागण्यांकडे विशेष लक्ष देता यावे, म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. जवळपास ४ तास उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या अडचणी समजून घेतल्या. या बैठकीत रवींद्र वायकर हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत समन्वयक म्हणून काम करतील असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. यापुढील काळात रवींद्र वायकर शिवसेना आमदारांच्या अडलेल्या कामांचा पाठपुरावा करणार आहेत. एकूणच महाविकासआघाडीचे सरकार चालवत असताना पक्षाच्या आमदारांच्या मागण्यांकडे देखील बारकाईने लक्ष देता यावे, म्हणून वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, रवींद्र वायकर शिवसेनेचे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.