आमटे कुटुंबाला प्रश्न विचारात शीतल यांच्या सासऱ्याचे आरोप

 

नागपूरः वृत्तसंस्था । डॉ. शीतल आमटे – कराजगी यांनी कौटुंबीक वादातून आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. आता शीतल यांचे सासरे शिरीष कराजगी यांनीही एक पत्र लिहीत आमटे कुटुंबाला काही प्रश्न उपस्थित केले आहे.

आनंदवनात दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. या घटनेने समाजमन हादरले आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं गुढ अजून कायम असून त्यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

डॉ. शीतल आमटे- करजगी या विकास व भारती आमटे यांच्या कन्या व बाबा आमटे यांच्या नात होत्या. महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. शीतल यांच्या आत्महत्येनंतर त्यांचे सासरे शिरीष कराजगी यांनी एक जाहीर पत्र लिहित आमटे कुटुंबांतील कौटुंबीक वादासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. आनंदवनातील अंतर्गत वाद व भेदभावाचा सामना करावा लागल्यामुळं शीतल या तणावात होत्या आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला, असा आरोपही त्यांनी केला आहे.

शिरीष कराजगी यांनी लिहलेल्या पत्रात, समजात घडणाऱ्या अन्यायाविरोधात लढणाऱ्या आमटे कुटुंबातील मुलीला या पद्धतीने त्रास सहन करावा लागला, या घटनांमुळं मुला-मुलींमध्ये भेदभाव करणाऱ्या या देशातील मुली काय आशा ठेवतील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आनंदवनातील आरोप व कुटुंबातील अंतर्गंत वाद हे ती सहन करु शकली नाही, असंही या पत्रात नमूद केलं आहे.

डॉ. शीतल आमटे यांचं आनंदवनासाठीचे योगदान आमटे कुटुंबाला माहिती नाही का? तरीही त्यांच्याविरोधात संपूर्ण कुटुंब का गेलं? कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी का बोलत नव्हते? शीतल आमटे यांच्याविरोधात मीडियानं कोणत्या आधारावर माहिती दिली? असे अनेक प्रश्न शिरीष यांनी पत्रात उपस्थित केले आहेत.

शिरीष कराजगी यांनी शीतल आमटे यांचा भाऊ व विकास आमटे यांचा पुत्र कौस्तुभ आमटे यांचाही या पत्रात उल्लेख केला आहे. महारोगी सेवा समितीच्या कार्यकारणीत कौस्तुभ यांना पुन्हा स्थान देण्यात आले. यावरुनच कराजगी यांनी कौस्तुभ यांना पुन्हा कार्यकारणीत स्थान देण्याइतकं त्यांनी कोणतं उल्लेखनीय कार्य केलं आहे? गेल्या ४- ५ वर्षात त्यांच्याविषयी व त्यांच्या कार्याविषयी एकाही वृत्तपत्रात वाचलं नाहीये, ते इतकी वर्ष काय करत होते? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

Protected Content