आत्मनिर्भर जॉब पोर्टलवर ४० दिवसात ६९ लाख बेरोजगारांची नोंदणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । करोना व्हायरस लॉकडाउनमुळे देशात मजुरांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं, बेरोजगारांची संख्या वाढली. त्यानंतर 11 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलेल्या एका सरकारी जॉब पोर्टलवर केवळ 40 दिवसांमध्येच तब्बल 69 लाखांहून अधिक जणांनी नोकरीसाठी नोंदणी केल्याचं समोर आलं आहे. पण यांच्यापैकी नोकरी मिळालेल्यांची संख्या खूप कमी आहे.

14 ऑगस्ट ते 21 ऑगस्टदरम्यान केवळ एका आठवड्यात 7 लाखांहून जास्त लोकांनी सरकारी जॉब पोर्टलवर नोकरीसाठी नोंदणी केली. पण या आठवड्यात नोकरी मिळालेल्यांची संख्या फक्त 691 आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे Aatmanirbhar Skilled Employee Employer Mapping या पोर्टलवर अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार नोकरीच्या शोधात असलेल्या 3.7 लाख उमेदवारांपैकी केवळ 2 टक्के जणांना नोकरी मिळाली. पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या 69 लाख स्थलांतरीत मजुरांपैकी 1.49 लाख जणांना नोकरी ऑफर करण्यात आली होती, पण केवळ 7,700 जणांनी नोकरी स्वीकारुन कामाला सुरूवात केली.

निरनिराळ्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या लोकांना मदत करण्यासाठी असलेल्या या पोर्टलमध्ये केवळ स्थलांतरीत कामगारच नव्हे तर इलेक्ट्रीशियन, टेलर, फील्ड-टेक्नीशियन, शिलाई मशिन ऑपरेटर यांनीही मोठ्या संख्येत नोंदणी केली होती, कुरियर डिलीव्हरी, नर्स, अकउंट एक्सिक्यूटिव्ह, मॅन्युअल क्लीनर आणि सेल्स असोसिएट्सची मागणी अधिक आहे.

या डेटानुसार, केवळ 5.4 टक्के महिला आहेत. या पोर्टलवर 514 कंपन्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 443 कंपन्यांनी 2.92 लाख जॉब पोस्ट केले आहेत. त्यापैकी 1.49 लाख जणांना नोकरीची ऑफर देण्यात आली आहे. नोकरीसाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरयाणा तामिळनाडू आणि दिल्ली या मोठ्या राज्यांमधून जवळपास 42.3 टक्के जणांनी नोंदणी केली आहे. पोर्टलवर सर्वाधिक 77 टक्के जॉब कर्नाटक, दिल्ली , हरयाणा, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांसाठी पोस्ट करण्यात आले आहेत. येत्या काळात बेरोजगारी सरकारसमोर आव्हान ठरण्याची शक्यता आहे

Protected Content