मुंबई प्रतिनिधी । कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी नवनवीन मार्गांचा अवलंब केला जात असतांनाच आता सियाराम या ख्यातप्राप्त कंपनीने अँटी कोरोना कपडे बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.
सध्या कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यात या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले जात असून याच अनुषंगाने प्रॉडक्ट लाँच करण्यात आले आहेत. या अनुषंगाने सियाराम या ख्यातनाम कंपनीने आता अँटी कोविड वस्त्रांची मालिका ग्राहकांना सादर केली आहे. नावातच नमूद असल्यानुसार हे कपडे कोरोनाच्या विषाणूला प्रतिकार करत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे कपडे कोरोनापासून बचाव करण्यासाठी ९९.९४ टक्के इतके परिणामकारक पध्दतीत उपयुक्त असल्याचे सियारामने नमूद केले आहे. हेल्थगार्ड या ऑस्ट्रेलियातील ख्यातप्राप्त कंपनीच्या सहकार्याने ही मालिका बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आली असून याला जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO तर्फे मान्यता मिळालेली आहे.
या संदर्भात सियाराम सिल्क मिलचे मुख्य कार्यकारी संचालक रमेश पोद्दार म्हणाले की, मानवी शरिराचा जवळपास ९० टक्के भाग हा कपड्यांनी आच्छादीत असतो. यामुळे कोविड-१९ विषाणू हा कपड्यांवर पसरत असतो. आमच्या नवीन मालिकेतील कपड्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे रसायन असून ते तात्काळ कोविड-१९ विषाणूचा खात्मा करते. यामुळे हे कपडे घातल्यानंतर कोरोनाचा यशस्वीपणे प्रतिकार करता येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर या कपड्यांमुळे कोरोनाचा प्रतिकार होत असला तरी यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.