कोविडची प्राथमिक चाचणी झालेल्या रुग्णांना त्यांचे अहवाल मिळावेत ; गणेश पाटील यांची मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी । कोविड-१९ ची प्राथमिक चाचणी झालेल्या रुग्णांना त्यांचे अहवाल व इतर संबंधित माहिती मिळावी अशी मागणी गणेश पाटील यांनी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व महापौर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

कोविड-१९ सेंटरमध्ये संशयित रूग्णांचे प्राथमिक स्वॅब घेतल्यानंतर त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना त्याच ठिकाणी क्वारंटाइन करण्यात येत आहे. त्यानंतर रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर त्या रूग्णांना पॉझीटीव्ह कोविड-१९ सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. तर निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या रूग्णांना लागलीच डिस्चार्ज देवून त्यांच्या हातावर १४ दिवसांचा ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का उमटवून त्यांना घरीच राहणेस सांगितले जात आहे. परंतु, या रूग्णांना कुठल्याही प्रकारे त्यांचा रिपोर्ट लेखी स्वरूपात न देता रिपोर्ट तोंडी सांगितले जातात. केवळ सिव्हील हॉस्पीटल, जळगाव येथे दाखल होणाऱ्या रूग्णांचेच लेखी रिपोर्ट दिले जातात. इतरत्र म्हणजेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वसतिगृह, जळगाव येथे दाखल होणाऱ्या रुग्णांचे रिपोर्ट दिले जात नाहीत. यामुळे रूग्णांच्या मनात आपला रिपोर्ट खरोखरच निगेटीव्ह आला आहे किंवा नाही याबाबत संदिग्ध भावना/भिती निर्माण झाली आहे. तरी भविष्यात कोरोना संकर्मणाबाबत कुठलीही शंका राहु नये व एखाद्या कोरोनाग्रस्तामुळे कोणीही बाधित होवू नये म्हणूनही रिपोर्ट मिळणे गरजेचे आहे. तसेच काही रूग्ण हे खाजगी व शासकीय कर्मचारी असतात त्यांना त्यांचे कार्यालयात पुरावा दाखविणेसाठीही हा रिपोर्ट लेखी स्वरूपात मिळणे आवश्यक व गरजेचे आहे. सध्या शासकीय कार्यालयांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तसेच रूग्ण दाखल होणेपूर्वी त्यांचेकडून आयसीएमआर फॉर्म भरून घेतला जातो. परंतु या फॉर्म मधील पान क्र.२ मधील शेवटचा टेबल TEST RESULT (To be filled by Covid-19 testing lab facility) यात कुठलीही माहिती भरली जात नाही अथवा रूग्णाचा रिपोर्ट पॉझीटीव्ह /निगेटीव्ह आल्याबाबत काहीही नमूद नसते. तरी वरील सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून कोविड-१९ ची प्राथमिक चाचणी / स्वॅब घेतलेल्या सर्व रूग्णांचा पॉझीटीव्ह/निगेटीव्ह रिपोर्टची लेखी प्रत/दाखला/प्रमाणपत्र संबंधित रूग्णांना देण्यात यावा अशी मागणी गणेश पाटील यांनी  केली आहे.

Protected Content