आता बावनकुळेंना गृहमंत्री देशमुखांचा तडाखा

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नये.” असा टोला अनिल देशमुख यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

 

महाराष्ट्राच्या वीजपुरवठा यंत्रणेचे संचालन आणि नियंत्रण करणाऱ्या संगणक यंत्रणेत (स्काडा) परदेशातून सायबर घुसखोरी झाल्याने गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला होता, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर पोलिसांच्या तपासाचा हवाला देत म्हटलं होतं. यावरून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

“स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्री आणि ऊर्जामंत्री नवीन शक्कल लढवत आहेत, असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेला आहे.

 

 

 

मुंबईत झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याच्या न्यूयॉर्क टाईम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अ‍ॅनालिसीस कंपनीच्या दाव्यांवर महाराष्ट्राच्या सायबर सेलने आपला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये सायबर सेलने ३ गंभीर मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये मुंबईतल्या एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पूर्ण अहवाल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला असून, त्या आधारावर आता सविस्तर तपास आणि चौकशी होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली होती.

Protected Content