आता प्रवासासाठी इ – पास सक्तीचा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली असून अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे.

 

पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे

 

राज्यात कोरोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशांनंतर २२ एप्रिल पासून त्यामध्ये अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.   .

 

संकेतस्थळावर ई-पास काढण्यासाठी अर्ज करण्यासाठी आणि पास मंजूर झाल्यास तो डाऊनलोड करण्यासाठी असे दोन पर्याय देण्यात येतात.

 

ब्राऊजरमधून https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळावर जा. याच पेजवर तुम्हाला ई-पाससाठी अर्ज करण्याची आणि तो डाऊनलोड करण्याची लिंक दिसेल. या पेजवर दोन पर्याय असतील. त्यामध्ये जर तुम्ही नव्याने ई-पास करण्यासाठी अर्ज करत असाल, तर Apply For Pass Here या टॅबवर क्लिक करा. पुढच्या पेजवर  महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? अशी विचारणा केली जाईल. आपल्याला हवा तो पर्याय त्यातून निवडा. इथे फक्त आंतरजिल्हा प्रवास करायचा असल्यास नाही पर्याय निवडा.मात्र, राज्याबाहेर जायचे असल्यास हो पर्याय निवडा. इथे तुम्हाला तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या निवडावी लागणार आहे.

 

पुढच्या पेजवर तुम्हाला प्रवासासंदर्भात सर्व माहिती भरावी लागेल. यामध्ये तुमचं नाव, प्रवासाची तारीख, मोबाईल क्रमांक, प्रवासाचं कारण, वाहनाचा प्रकार, वाहनाचा क्रमांक, सध्याचा पत्ता, इमेल आयडी, प्रवास सुरू होण्याचं ठिकाण, प्रवासाचं शेवटचं ठिकाण, तुम्ही सध्या कंटेनमेंट झोनमध्ये आहात का? परतीचा प्रवास यासंदर्भातली माहिती भरावी लागणार आहे.

 

 

या फॉर्मच्या खालीच तुमचा फोटो जोडण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. त्यासोबतच आधार कार्ड, वैद्यकीय कागदपत्रे (उपचारांसाठी जात असाल तर) अशी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. त्यासोबत डॉक्टरकडून घेतलेलं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी देखील लिंक देण्यात आली आहे.

 

सर्व माहिती भरल्यानंतर खाली Submit टॅबवर क्लिक केल्यास तुमचा ई पाससाठीचा अर्ज जमा होईल. त्याचा एक टोकन आयडी तुम्हाला मिळेल. अर्ज मंजू झाला किंवा नाकारला गेला याचा तपशील पाहण्यासाठी पहिल्या पेजवरच्या दुसऱ्या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला माहिती मिळवता येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिळालेला टोकन आयडी टाकून अर्जाचा तपशील पाहाता येईल. अर्ज मंजूर झाला असल्यास मिळालेला पास डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात येईल. तिथून अर्ज डाऊनलोड करून घेता येईल.

 

ऑनलाईन प्रक्रियेसोबतच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देखील प्रवासासाठी पास मिळवता येऊ शकतो असं देखील पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पासचा वापर केवळ आपातकालीन परिस्थितीतच करावा, असं देखील सांगण्यात आलं आहे.

Protected Content