ऑक्सिजन प्लांट लष्कराकडे द्या”, मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोदींना सूचना

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऑक्सिजन प्लांटचा ताबा लष्कराच्या हाती देण्याची सूचना मोदींना केली आहे .

 

राज्यांना ऑक्सिजन लवकर मिळावा यासाठी भारतीय लष्कराची मदत घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी पुढे सांगितलं. मुख्यमंत्री असूनही काहीच करू शकत नसल्याची व्यथाही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांसोबत झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत   मांडली.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपुढे हतबलता स्पष्ट दिसू लागली आहे. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. देशाची गंभीर स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दहा राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडुतील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे गाऱ्हाणं मांडलं.

 

“हवाई मार्गाने सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. ऑक्सिजन एक्स्प्रेसची सुविधा दिल्लीत सुरु झाली पाहिजे. त्याचबरोबर देशात लस एकाच किंमतीत देणं आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यांना वेगवेगळ्या किंमती का?”, असा प्रश्नही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत उपस्थित केला.

 

देशात  रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात तीन लाखांहून अधिक  रुग्णांची नोंद झाली आहे.

Protected Content