कोलकाता (वृत्तसंस्था) आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. आज देशाला आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. तसेच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणे आता कमी करावे लागणार आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. करोना व्हायरसच्या संकटादरम्या त्यांनी आज इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
यावेळी मोदी म्हणाले की, आयसीसीने स्थापनेपासूनच स्वातंत्र्यासाठीची लढाई पाहिली आहे. सरकारकडून अडचणींचा सामना देखील केला आहे. भीषण दुष्काळ, अन्न संकट पाहिले आहे. फाळणीचे दुःख पाहिले आणि सहन केले. यावेळी एजीएम अशा वेळी घडत आहे जेव्हा आपल्या देशाला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत आह. भारत देखील कोरोनाचा सामना करत आहे, मात्र इतर संकटेही आपल्या समोर येत आहेत. स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचे हब बनवण्यावर विचार सुरू आहे. आयसीसीनं ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्यानं पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असे म्हटले जात, असेही त्यांनी नमूद केले.