विधानसभाध्यक्ष हरीभाऊ बागडेंकडून नाथाभाऊंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

6a327daa a21c 4092 bbba 1f8380befd62

 

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) केंद्र व राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात जनहितासाठी राबवलेल्या विविध विकास योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवा, देशातील प्रत्येक नागरिक हा ‘लाभार्थी’ आहे. सरकारच्या साऱ्या योजना मतदारांपर्यंत पोहचवून येत्या विधानसभा निवडणुकीत नाथाभाऊंच्या मागे मोठ्या संख्येने उभे राहून सलग सातव्यांदा विधानसभेत पाठविण्यासाठी तयार रहा” असे आवाहन विधानसभा अध्यक्ष ना. हरीभाऊ बागडे यांनी कोथळी ता. मुक्ताईनगर येथे केले.थोडक्यात विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागळेंकडून नाथाभाऊंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील आयोजित बूथप्रमुख संमेलनात ते बोलत होते. यावेळी आ. एकनाथराव खडसे खा. श्रीमती रक्षाताई खडसे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, बेटी बचाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा बँकेच्या चेअरमन सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनिल नेवे, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमा तडवी, अनंत कुलकर्णी, पुरणमल चौधरी आदींसह सर्व जि.प. / पं.स. सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला गेल्या पाच वर्षातील विकास कामांचा आरसा असलेल्या ‘समर्पण’ या कार्यगौरव पुस्तिकेचे ना. हरीभाऊ बागडे यांचे शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी विविध उपक्रमांमुळे, शासकीय योजनांमुळे व महाजनादेश यात्रेमुळे संपूर्ण जिल्हा भाजपमय झाल्याचे सांगून यावर्षी नव्याने सव्वालाख युवकांची सदस्य नोंदणी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तर प्रदेश उपाध्यक्ष श्री. कांडेलकर यांनी येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्ते तयार असून ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ होण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गेल्या ३० वर्षापासून मतदार संघात झालेल्या विकास कामांच्या जोरावर नाथाभाउंचा विजय निश्चित असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर डॉ. फडके यांनी शतप्रतिशत मतदान भाजपाला होण्यासाठी बूथ प्रमुखांनी मतदार यादीचा बारकाईने अभ्यास करण्याचे आवाहन केले.

खा. रक्षाताई खडसे यांनी त्यांच्या दमदार मनोगतात केंद्रातील सत्तेचा पाया गावागावातील सशक्त बूथ असल्याचे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून प्रत्येक भारतीय नागरिकाच्या भावनांचा आदर केल्याचे स्पष्ट केले. नाथाभाऊंची नवडणूक म्हणजे मतदार संघातील प्रत्येक कार्यकर्त्याची निवडणूक असल्याने या निवडणुकीतही विकासाला मतदान होण्यासाठी शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. प्रसंगी निकालानंतर भव्य विजयी उत्सव मेळावा घेण्याचे त्यांनी घोषित केले.
यावेळी प्रचंड उपस्थितीने भारावून गेलेल्या नाथाभाऊंनी सर्वप्रथम सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे मजबूत संघटन असलेला मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासारखा महाराष्ट्रात अन्य कोणताही मतदारसंघ नसल्याचे सांगून यामतदारसंघात ९५% सरपंच भाजपाचे, सर्व नगरपालिका भाजपाकडे, वि.का. सोसायट्यासह बहुतांश सर्व जि.प./ पं.स. सदस्य भाजपाचे असल्याचे स्पष्ट करून गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ५९ हजाराची मोठी आघाडी असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रेरित होऊन पक्षात एकसारखी इनकमिंग सुरु असून येत्या निवडणुकीत विरोधक कोण असेल? असा प्रश्न निर्माण होणार आहे. या आधी श्री. कांडेलकर, श्रीमती रक्षाताई व ना. हरीभाऊंनी माझी उमेदवारी आजच्या मेळाव्यात जाहीर करून टाकल्याने या साऱ्यांच्या शिफारशीमुळे पक्ष नेतृत्व नक्किच गंभीरतेने विचार करेल असे आमदार खडसे यांनी सांगितले.

 

गेल्या निवडणुकीतही भाजपा विरोधात सगळे पक्ष एकत्र येऊनही काही उपयोग झाला नाही. गेल्या ३० वर्षातील विकास कामांचा विचार केला तर ‘विकासाची एकनाथ गाथा’ तयार होईल त्यामुळे समर्पण ही केवळ झलक आहे. मा. नरेंद्र मोदींसारखा एखादाच नेता जन्माला येतो असे सांगून त्यांच्या कार्यकर्तुत्वाविषयी गौरवोद्गार काढले. तसेच सावदा येथे हिंदू दफनभूमीसाठी विशेष मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेही आभार मानले. येत्या ८ सप्टेंबरला लाभर्थ्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन केले असून १२ हजार लाभार्थ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. शेवटी ‘कामाला लागा’ असा गर्भित सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुनिल नेवे यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांचा बूथनिहाय आढावा घेतला. कार्यक्रम यशश्वितेसाठी स्वीय सहाय्यक योगेश कोलते, कृ. ऊ. बा.स.सभापती निवृत्ती पाटील, विलास धायडे राजू माळी, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, भागवत टिकारे, सुनिल पाटील व सर्व तालुका सरचिटणीस यांनी परिश्रम घेतले.

Protected Content