खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची मागणी; यावल तहसीलदारांना निवेदन

यावल प्रतिनिधी । गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी कोचिंग क्लासेस पुर्णपणे बंद करण्यात आले आहे. कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने खासगी क्लासेस सुरू करण्याबाबत फेरविचार करावा अशी मागणीचे निवेदन प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील किमान एक लाख खाजगी शिकवणी वर्ग चालवणारे क्लाससंचालक, आमच्या सर्वाकडे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी म्हणून काम करणारे किमान ३ ते ४ लाख कर्मचारी, त्यांच्यावर अवलंबून असणारे किमान २० लाख कुटुंब सदस्य, तसेच आमच्या सर्वांच्या खाजगी शिकवणी वर्गाना वेगवेगळ्या सेवा देणारे किमान २ ते ३ लाख व्यावसायिक, त्याषेवर अवलंबून असणारे कुटूबिय असे अंदाजे एकूण ५० लाखांहून अधिक महाराष्ट्रातील खाजगी शिकवणी वर्ग आणि पूरक सेवा देणारे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवा पुरवठादार हे कोरोना महामारी (कोविड-१९) संकटामुळे अडचणीत सापडले आहेत.

१६ मार्च २०२० पासून आपण दिलेल्या सूचनेनुसार आमची संपूर्ण कोचिंग व्यवसाय ठप्प आहे. बंद आहे. आमच्यातले ९५ टक्के क्लास संचालक छोटे क्लास संचालक आहेत व क्लासेसवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. विद्यार्थी व पालक यांच्याकडून वर्षभराची फी आम्हाला मार्च अखेर अथवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मिळते. परंतु महामारीमुळे व आपल्या आदेशानुसार आम्हाला तात्काळ क्लासेस बंद करावे लागले त्यामुळे आमची फी सुद्धा बुडाली. आम्हाला कोणीही फी त्यानंतर आणून दिली नाही. गेल्या तीन महिन्यापासून क्लासेस बंद असल्यामुळे व हाती पैसेच नसल्यामुळे सामान्य क्लास संचालक अत्यंत अडचणीत आहेत. ग्रामीण भागात तर ऑनलाईन क्लासेस घेणे शक्य होणार नाही, असे निवेदन आम्ही आपणास संपूर्ण राज्य स्तरातून एकाच दिवशी एकाच वेळी देत आहोत. क्लासेस सुरु करतांना आपण दिलेल्या सूचनांचे उदा. स्वच्छता, मास्क, सोशल डिस्टन्सिंग ह्या सर्वच गोष्टींचे १०० टक्के पालन होईलच याची आम्ही आपणास ग्वाही देतो. कृपया आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी विनंती संघटनेच्या माध्यमातून केली आहे.

Protected Content