आता चीनला धडा शिकवाच- शिवसेनेची मागणी

मुंबई प्रतिनिधी । आमच्या सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे व मेणबत्त्या नसून बंदुकाच असल्याचे चीनला दाखवून देण्याची हीच वेळ असून त्यांना आता धडा शिकवाच अशी मागणी शिवसेनेने आज केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज चीनच्या मुजोरीवर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, हिंदुस्थानच्या ६० चौरस मैल भूभागावर चीनने घुसखोरी करून ताबा मिळविला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. १९६१ चे युद्ध झाले त्यात तिबेट हाच वादाचा मुद्दा होता. तिबेटचा घास चीनने गिळला आहे व त्याच तिबेटच्या लष्करप्रमुखांची नेमणूक चीनने त्यांच्यावतीने चर्चा करण्यासाठी केली. यातील चीनचा कावा समजून घेतला पाहिजे. आपण पाकिस्तानला रोज लाथा घालतो कारण हा सरळ हिंदू-मुसलमान झगडा ठरतो व त्याचे राजकीय फायद्या-तोट्याचे गणित असते, पण चीन आपला देश रोज इंच इंच कुरतडत आहे. त्याचे आमच्या राज्यकर्त्यांना काहीच वाटत नाही. लडाखमध्येच राहणारे प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सांगतात, अहो, मी लडाखमध्येच राहतो. दररोज चिनी सैन्य पुढे पुढे येत असल्याचे मी पाहतो. १९६२ साली चीनने हिंदुस्थानला फसवले. त्यावेळी आपण काय केले? लडाखमध्ये आमची लढाऊ विमाने टेहळणी करतात, तशी चीनचीही विमाने घिरट्या घालतात. सोनम वांगचुक यांनी सत्य सांगितले आहे. एक इंचही मागे हटणार नाही हे ठीक, पण आपण मागे न हटता चिनी सैन्य पुढे सरकत आहे हे कटू सत्य आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, कोरोना महामारीमागे चीनचा हात असल्यामुळे चीनवर सार्या जगाचा रोष आहे. चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्याची हीच वेळ आहे. कोरोनामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था संपली आहे. बेरोजगारी वाढली आहे आणि हिंदुस्थान-चिनी मालाची बाजारपेठ खुली करून चीनच्या राक्षशी महत्त्वाकांक्षेला आणि साम्राज्यवादालाच ताकद देत आहे. चिनी वस्तूच्या वापरावर बंदी घालणे गरजेचे आहे व सरकारला आता त्यावर निर्णय घ्यावाच लागेल. पाकिस्तानशी लढण्यासाठी ५६ इंचाची छाती हवी, असे आम्हाला वाटत नाही. पाकिस्तान हा चीनचा गुलाम आहे. मात्र चीनशी लढण्यासाठी ५६ इंचाची छाती हवी व ती पंतप्रधान मोदी यांच्यापाशी आहे. त्यामुळे चीनला घाबरण्याचे कारण नाही. देशाने चिंता करू नये. सीमेवरील सैन्य खंबीर आहे. १९६२ सालचा हिंदुस्थान आज नाही. आमच्या सैनिकांच्या हाती थाळ्या, चमचे, मेणबत्त्या नसून बंदुकाच आहेत! हे चीनला दाखवून द्यायची हीच वेळ असल्याचे या अग्रलेखात म्हटले आहे.

Protected Content