डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाची तोडफोड; राज्यभरातून निषेध

मुंबई प्रतिनिधी । विश्‍वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणार्‍या राजगृहात दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचे समोर आले असून याचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी जनतेने शांतता राखण्याचे आवाहन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवारी संध्याकाळी तोडफोड करण्यात आली आहे. राजगृहाच्या काचांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसंच घरातील कुंड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. हल्लेखोरोनी सीसीटिव्हीलाही फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी या ठिकाणी भेटीला येतात. या पार्श्‍वभूमिवर, येथे तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना आंबेडकर कुटुंबीयांनी दिले आहे.

दरम्यान, राजगृहामध्ये तोडफोड झाल्याची माहिती समोर आल्यावर राज्यभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी तातडीने गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली आहे. विधानसभाध्यक्ष नाना पटोले, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही याचा निषेध केला आहे. यासोबत या घटनेचा राज्यभरातून निषेध करण्यात येत आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी असं आवाहन केलं आहे. मी सगळ्यांना व्हिडीओद्वारे आवाहन करतो आहे की सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी, ही गोष्ट खरी आहे की राजगृहावर दोघेजण आले त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य केलं. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये, पोलीस त्यांचं काम करत आहेत. आपण सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

Protected Content