विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत- शिवसेनेचा टोला

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील महाविकास आघाडीमध्ये कोणताही अंतर्विरोध नसून चर्चेने प्रश्‍न सुटतात असे नमूद करत विरोधकांनी स्वप्न पाहू नये असा टोला आज शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामना मध्ये अंतर्विरोधाच्या चिपळ्या या शीर्षकाखाली अग्रलेख प्रकाशित करण्यात आला असून यात पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, सध्या पावसाची रिपरिप सुरूच असते तशी बातम्यांची रिपरिप सुरू आहे. रिपरिप म्हणजे फक्त शिडकावा, वादळ वगैरे नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद आहेत. वादाचे रूपांतर वादळात होईल अशी रिपरिप गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. सरकारमधील तीन प्रमुख पक्षांचे अजिबात पटत नाही व अनेक निर्णयांवर मतभेद आहेत. त्यामुळे शरद पवार हे शिष्टाई करण्यासाठी मातोश्रीवर गेले. तीन पक्षांत समन्वयाचा अभाव असून पडद्यामागे बरेच काही सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या रिपरिप बातम्यांत काडीमात्र तथ्य नाही. मुंबई पोलीस दलातील बदल्यांचा गोंधळ झाला व त्या बदल्यांतून अविश्‍वासाचे वातावरण उघड झाले, असे आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. त्यात तथ्य आहे असे वाटत नाही व त्याबाबत मनधरणी वगैरे करण्यासाठी गृहमंत्री देशमुख पवारांना घेऊन ङ्गमातोश्रीफवर पोहोचले, असे सांगणे व छापणे हेच मुळी मानसिक गोंधळाचे लक्षण आहे. दोन-चार बदल्या आणि बढत्यांच्या वादांतून आघाडीची सरकारे कोसळू लागली तर देशाचे राजकारण ठिसूळ पायावर उभे आहे असे समजावे लागेल.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, विरोधकांच्या नजरेत जो गोंधळ किंवा अंतर्विरोध वाटतो, ते प्रत्यक्षात सरकारातील जिवंतपणाचे लक्षण असू शकते. त्यांना काही चुकीचे किंवा धूसर दिसत असेल तर त्यांनी डोळ्यांची तपासणी करणे व चष्म्याचा नंबर बदलून घेणे हा त्यावरचा एक उपाय आहे व त्याबाबत विरोधी पक्षाने हेळसांड करू नये. चांगल्या विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे व फडणवीस, दरेकर हे विधिमंडळातले दोन्ही विरोधी पक्षनेते आता त्यांच्या पद्धतीने चांगले काम करीत आहेत. पदाची प्रतिष्ठा त्यांनी राखावी इतकीच माफक अपेक्षा.सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष काँगेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात सांगत आहेत की, सरकारमध्ये कोणताही अंतर्विरोध नाही. चर्चा होऊन प्रश्‍न सुटतात. विरोधकांनी स्वप्ने पाहू नयेत. शरद पवारांसारखे नेते सरकार पाच वर्षे चालवू याची ग्वाही देत आहेत. तरीही विरोधकांचे अंतर्विरोधाच्या चिपळ्या वाजविण्याचे धंदे सुरूच आहेत. ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का?, असा सवाल या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

Protected Content