नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नकोच : राजू शेट्टी


मुंबई (वृत्तसंस्था)
अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

 

राजू शेट्टी म्हणतात, राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्विकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले.

 

जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. 12 जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकार मदनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंदर पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एकमताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरले, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली. पण मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणिही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये, असेही राजू शेट्टी यांनी फेसबुकद्वारे सांगितले आहे.

Protected Content