आजही महात्मा फुले यांच्या मौलिक विचारांची गरज आहे – कुलगुरु डॉ.निंबा ठाकरे

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र सशक्त करण्यासाठी आजही महात्मा फुले यांच्या मौलिक विचारांची गरज आहे, असे असे प्रतिपादन महात्मा फुले व्याख्यानमालेत व्याख्यान देतांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ.निंबा कृष्णा ठाकरे यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेंतर्गत महात्मा फुले अध्यययन व संशोधन केंद्र व जनसंपर्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिनेट सभागृहात महात्मा फुले व्याख्यानमालेचे तसेच डॉ. ठाकरे यांच्या “ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल” या दीर्घ कवितेचे प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, जैन उद्योग समुहाचे श्री. अशोक जैन, प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील हे होते. डॉ.ठाकरे पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडून दिली. तसेच शेतकरी व समस्त वंचित आणि बहुजनांचे प्रश्न मांडले. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली. त्यांच्या विचारातून मागासवर्गीय व शेतकरी यांच्यावरील अन्याय दूर होण्यास मदत झाली. महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा छत्रपती शाहू महाराजांनी पुढे नेत ५० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात समानता निर्माण करण्यासाठी प्रेरित करतात. डॉ. ठाकरे यांनी “ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल” या दीर्घ कवितेबाबत माहिती देतांना सांगितले की, ही कवितेतील तो ते स्वत: नसून विद्यापीठ उभारणीत हातभार लावणाऱे सर्व घटक असल्याचे त्यांनी सांगितले. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते या दीर्घ कवितेचे प्रकाशन करण्यात आले. या कविता संग्रहाच्या १०० प्रती विद्यापीठ ग्रंथालयास भेट देण्यात आल्या.

अशोक जैन यांनी सांगितले की, विद्यापीठ उभारणीत प्रथम कुलगुरु ठाकरे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या हया कवितेत मोठा अर्थ आहे असे सांगून ठाकरेसरांच्या या कविता संग्रहातील दोन कविता वाचून दाखवल्या. श्री.शंभू पाटील यांनी “ज्यावेळी तो ह्या मातीवर नसेल” या दीर्घ कवितेवर भाष्य करतांना सांगितले की, ही दीर्घ कविता आत्मचरित्रही आहे आणि विद्यापीठ उभारणीची गोष्टही आहे असे म्हणता येईल. जळगाव हे कवितेचे गाव आहे. केशवसूत, सानेगुरुजी, मर्ढेकर, श्रीकांत देशमुख, बहिणाबाई आदींनी जळगावात येऊन कविता केल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, ठाकरेसरांनी या कविततेत अजिंठा लेणी आणि गौतम बुध्दांचा उल्लेख केला आहे. या कवितेतून आंतरसंबंध जोडले गेल्याची भावना निदर्शनास येते. ही कविता सर्व सामान्यांच्या आयुष्य जगण्याची कविता वाटते असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रबोधन व्हावे यासाठी ठाकरेसरांनी १९९१ मध्ये महात्मा फुलेंच्या स्मृतीदिनी विद्यापीठात व्याख्यानमाला सुरु केली. पुढे या व्याख्यानमालांची संख्या १६ झाली.

व्याख्यानमालांचा फायदा विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासासाठी होतेा. ठाकरेसरांची दीर्घ कविता ही पूर्णपणे विद्यापीठावर आहे. या कवितांमधून विद्यापीठातील माती, परिसर, टेकडया आणि त्यावर ठाकरेसरांचे विद्यापीठावर असलेले प्रेम निदर्शनास येते. या कविता विद्यापीठाची मुशाफिरी घडविणारी आहे. एका पानावर विद्यापीठातील छायाचित्रे आणि दुसऱ्या पानावर कवतिेच्या ओळी असे दृश्यरुप आणि चित्ररुप अशी मांडणी केली आहे. प्रास्ताविक कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शंभू पाटील यांनी तर आभार महात्मा फुले अध्ययन केंद्राच्या प्रभारी प्रमुख डॉ.पवित्रा पाटील यांनी मानले. या व्याख्यानास सौ. पुष्पलता ठाकरे, वाणिज्य व व्‍यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे,विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु. पगारे, संचालक जे.बी. नाईक, वित्‍त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, विभाग प्रमुख विश्वकर्मा, अभियंता एस.आर.पाटील, अभि.राजेश पाटील, एस.आर.गोहिल, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content