पुणे : वृत्तसंस्था । पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय संशोधन केंद्रात अठरा महिन्यांच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळून आला. याला वैद्यकीय भाषेत ‘फिट्स इन फिटू’ म्हणतात . हा अविकसित मृत गर्भ काढण्याचे आव्हान डॉक्टरासमोर होतं. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो वजनाचा मृत गर्भ काढण्यात डॉक्टरांना यश आलं.
मूळ नेपाळमधील रहिवाशी असलेल्या एका महिलेची अठरा महिन्यापूर्वी प्रसूती झाली होती. महिलेनं मुलाला जन्म दिला. मात्र, दिवसेंदिवस बाळाच्या आरोग्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्याचं पोट वाढत होतं. त्याच्या उपचारासाठी बाळाच्या आईवडिलांनी पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉ. शैलजा माने यांच्याकडे प्राथमिक तपासणी केली. डॉक्टरांनी बाळाच्या आरोग्याबाबत त्वरित सर्व विभागाशी समन्वय साधून उपचार सुरु केले.
“आईच्या पोटात दोन गर्भ तयार झाले होते. त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली होती. पुढे जन्मानंतरही बाळाच्या शरीरात ही गाठ वाढत होती. त्यामुळे बाळाला योग्य व पूर्ण पोषण मिळत नव्हते. परिणामी त्याच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत होत्या. पुढे जाऊन इतर अवयवांवर ही गंभीर परिणाम झाला असता, त्यासाठी ही गाठ शरीराबाहेर काढणे महत्वाचे होते. पाच लाख बालकांमध्ये एखादी अशी दुर्मिळ घटना पुढे येते. जगभरातील आकडेवारीनुसार २०० अशी प्रकरणे आजपर्यत नोंदवली गेली आहेत. हा मृत गर्भ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते. याची कल्पना रुग्णांच्या नातेवाईकांना दिली होती. ही केस डॉ सुधीर माळवदे यांनी पुढील उपचारासाठी पाठवली होती,” अशी माहिती डॉ. माने यांनी दिली.
रुग्णाची सोनोग्राफी व सीटी स्कॅन अहवालाचे मूल्यमापन केल्यानंतर हा गर्भ बाळाच्या यकृत व उजव्याबाजूच्या मूत्राशयाच्या मधोमध असून, तो मोठ्या रक्त वाहिन्यांना चिकटलेला असल्याचे दिसून आलं. हा गर्भ अविकसित असून, तो मृत असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झालं. बाळाच्या सर्व आरोग्य तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झालं. ही संपूर्ण गाठ काढण्यात बाल शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. प्रणव जाधव व त्यांच्या टीमला यश मिळाले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना तब्बल ६ तास लागले. “आमच्या टीममधील कुशल अनुभवी शल्य चिकित्सक व इतर तज्ज्ञांच्या मदतीने तसेच उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं,” अशी माहिती डॉ. जाधव यांनी दिली.
शरीराबाहेर काढलेल्या गर्भ गाठ परिक्षणाकरिता पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारूशीला गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ विद्या विश्वनाथ यांच्या टीमकडे ते पाठविण्यात आली. त्याच्या सर्व तपासण्या केल्या असून गाठीपासून त्या बालकाला कोणताच धोका व दोष नसल्याचे स्पष्ट झाले. गर्भ गाठीचे वजन ५५० ग्राम असून परीक्षण मध्ये हात व पायची बोटे, त्वचा, केस, हाडे तसेच मायक्रोस्कोपमध्ये इतरही अवयव दिसून आले. याला हे ‘फिट्स इन फिटू’ असल्याचे निदान झाले.
या अठरा महिन्याच्या बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश मिळाले. हे बाळ आता इतर बालकाप्रमाणे सामान्य जीवन जगू शकते. त्याच्यावरील सर्व उपचार पूर्ण झाले असून त्याला आज घरी सोडण्यात आले आहे. रुग्णाच्या आई वडिलांनी सर्वांचे आभार मानले. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल सहभागी सर्वांचे बालरोग विभागप्रमुख डॉ. शरद आगरखेडकर यांनी कौतुक केलं.