आंदोलक शेतकऱ्यांना समर्थन : खेळाडूंची पुरस्कारवापसी !

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी खेळाडूंनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन केलंय. आंदोलकांविरोधात ‘बळाचा वापर’ करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतलाय.

कोरोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यांवर आहेत. केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदा रद्द करावा किंवा किमान हमीभावाचा कायद्यातील तरतुदींत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस समाजातून पाठिंबा वाढताना दिसतोय.

या खेळाडूंमध्ये पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू करतार सिंह, अर्जुन पुरस्कार सन्मानित खेळाडू सज्जन सिंह चीमा आणि हॉकी खेळाडू राजबीर कौर यांचाही समावेश आहे. ५ डिसेंबर रोजी दिल्लीत जाऊन राष्ट्रपती भवनाबाहेर आपला पुरस्कार ठेवणार असल्याचं या खेळाडूंकडून सांगण्यात आलंय.

दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारनं तसंच हरयाणातील खट्टर सरकारनं थंडीच्या दिवसांत आंदोलकांवर पाण्याचा मारा केला, अश्रुधुराचा वापर केला, याची निंदाही या खेळाडूंनी केलीय.

‘आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि ते गेल्या अनेक महिन्यांपासून शांतीपूर्ण मार्गानं आंदोलन करत आहेत. या काळात एकही हिंसक घटना घडली नाही. परंतु, ते दिल्लीला निघाले असताना त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. आमच्या ज्येष्ठांवर आणि बंधुंच्या पगडीचा अवमान झाला तर आम्ही आमच्या पुरस्कार आणि सन्मानाचं काय करणार?’, असा प्रश्न विचारणाऱ्या चीमा यांना ३० हून अधिक माजी ऑलम्पिक आणि इतर खेळांत पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूंकडून समर्थन मिळालंय. यामध्ये गुरमेल सिंह आणि सुरिंदर सिंह सोढी यांचाही समावेश आहे. हे दोघेही १९८० मॉस्को ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी टीमचे सदस्य होते.

Protected Content