आंदोलक शेतकऱ्यांचे समर्थन करणारे सेलिब्रिटी परराष्ट्र खात्याच्या नजरेत बेजबाबदार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । खळबळ निर्माण करणारे सोशल मीडिया हॅशटॅग आणि वक्तव्यांनी लोकांना आकर्षित करण्याची पद्धत, खास करुन जेव्हा लोकप्रिय व्यक्तींकडून वापरली जाते तेव्हा ती योग्य नसते ती बेजबदारपणा दाखवते,” असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. काही विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. त्याचबरोबर या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे.

अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. रिहानाचं हे ट्विट बरंच चर्चेत आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने ट्विट केल्याने सोशल नेटवर्किंगवर आणि बातम्यांमध्ये या ट्विटची चांगलीच चर्चा आहे. ग्रेटा थनबर्गसारख्या सेलिब्रिटींनीही या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक जारी केलं आहे. यामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने, भारतीय संसदेने पूर्ण चर्चा करुन कृषी क्षेत्राशी संबंधित सुधारणावादी कायदे संमत केले आहेत असं स्पष्ट केलं आहे.

बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये सेलिब्रिटींनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. “ रिहानाबरोबरच ग्रेटा थनबर्ग, अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नातेवाईक असणाऱ्या मीना हॅरिस यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलीय.

या विरोधाच्या नावाखाली काही स्वार्थी गट आपला अजेंडा राबवत असून ते शेतकऱ्यांना थेट रेल्वे मार्गावर उतरवण्यास भाग पाडत आहेत. हे सर्व पाहणे दूर्देवी आहे. असाच प्रकार २६ जानेवारी पाहयाला मिळाला, असा उल्लेखही परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने, “अशाप्रकारच्या विषयांवर वक्तव्य करण्याआधी या विषयांसंदर्भातील खरी माहिती घ्यावी असा आम्ही आग्रह करतो. भारतीय संसदेने पूर्ण चर्चा करुन कृषी क्षेत्राशी संबंधित सुधारणावादी कायदे संमत केले आहेत,” असंही म्हटलं आहे.

आंदोलनाच्या नावाखाली काही स्वार्थी गटांनी भारताविरोधात आंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा बाहेरच्या तत्वामुळे प्रेरणा घेऊन जगातील अनेक ठिकाणी महात्मा गांधीच्या पुतळ्यांचे नुकसान करण्यात येत आहे. हा सर्व भारतासाठी आणि कोणत्याही सभ्य समाजासाठी खूप चिंतेचा विषय आहे, असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

Protected Content