पुन्हा सर्वांनी मिळून केला नाथाभाऊंचा ‘गेम’ : अजून एक सत्तास्थान संपुष्टात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज एक्सक्लुझीव्ह अ‍ॅनालिसीस | जिल्हा दुध संघाच्या पाठोपाठ जिल्हा बँकेतही जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी मिळून आमदार एकनाथराव खडसे यांचा ‘गेम’ केल्याचे आजच्या नाट्यमय घडामोडीतून दिसून आले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घटना घडल्या. या निवडणुकीची सूत्रे ही स्थानिक पातळीवर आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडे होती. आणि साहजीकच पक्षाला यात विजय मिळवून देण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावरच होती. हाती बहुमताचा आकडा असल्याने ते निश्‍चींत होते. मात्र पडद्याआड बरेच काही शिजत होते. यातूनच आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांना पराभव पत्करावा लागला. हा खर तर वैयक्तीक पातळीवर एकनाथराव खडसे यांना धक्का देणारा पराजय ठरला आहे.

गेल्या सात वर्षात एकनाथराव खडसे यांच्या कारकिर्दीत ते विलक्षण चढउतार आले ते कुणालाही थक्क केल्याशिवाय राहणार नाहीत. मे २०१६ मध्ये त्यांच्याकडे तब्बल १२ खाते असतांना आरोपांमुळे त्यांचे मंत्रीपद गेले. २०१९ मध्ये त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळाली. मात्र विरोधकांनी पाठीमागे हातमिळवणी केल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर ते राष्ट्रवादीत गेले तर राज्यपाल नियुक्त आमदारकीचा निर्णय प्रलंबीत राहिला. जून २०२२ मध्ये विधानपरिषदेत विजय मिळाला तर दुसर्‍याच दिवशी सत्ता गेली.

यामुळे एकनाथराव खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीत दुर्दैवाचे फेरे सुरू झाल्याचे मानले गेले. या पार्श्‍वभूमिवर, कालच त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेच्या गटनेतेपदाची जबाबदारी आल्याने त्यांच्या साठी काही प्रमाणात दिलासा मिळाला. तर दुसर्‍याच दिवशी म्हणजे आज त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या जेडीसीसीच्या जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला आहे.

जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मंदाताई खडसे यांच्या विरोधात निवडणूक लढवत त्यांना पराभूत केले. या निवडणुकीत सत्ताधार्‍यांनी दुध संघातील खडसेराज संपुष्टात आणले. या पाठोपाठ आता जिल्हा बँकेतही एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व आपोआपच समाप्त झाले आहे. अर्थात, जिल्ह्याच्या सहकारात मोठ्या मानल्या जाणार्‍या दोन सत्तास्थानांवरून एकनाथराव खडसे बेदखल झाले आहेत. दुध संघात ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण ताकद पणाला लाऊन खडसेंना पराभूत केले होते. तर आजच्या नाट्यमय घटनांमध्ये देखील या दोन्ही मातब्बर नेत्यांची मोठी भूमिका असल्याची बाब उघड झाली आहे. यामुळे एकनाथराव खडसे यांना या दोन्ही मान्यवरांनी पुन्हा एकदा पाणी पाजल्याचे दिसून आले आहे.

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे कॉंग्रेसच्या संचालकांसह नाथाभाऊंचे अतिशय कट्टर समर्थक मानले जाणारे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी देखील त्यांची साध सोडल्याचे दिसून आले. त्यांनी स्वत: याबाबत आज पत्रकारांशी बोलतांना संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे. परिणामी, नाथाभाऊंना मानणार्‍यांना आपल्याकडे वळविण्यात देखील दोन्ही मंत्री यशस्वी झाल्याचे आज अगदी उघडपणे स्पष्ट झाले आहे.

Protected Content