आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोदींवर परखड टीका !

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारवर देशात विरोधकांकडून आणि तज्ज्ञांकडून टीका केली जात असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील पंतप्रधान  मोदी आणि  केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारतातील परिस्थिती गंभीर होण्यासाठी नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं आहे

 

देशभरात कोरोनाचं संकट थैमान आहे.  ऑक्सिजनच्या अभावी रुग्णांना  प्राण गमवावे लागत आहेत. रेमडेसिविर आणि  लसीचादेखील मोठा तुटवडा   असताना १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणादेखील करण्यात आली आहे.

 

अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र  न्यू यॉर्क टाईम्सने व आरोग्य तज्ज्ञांनी या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अतीआत्मविश्वास कारणीभूत ठरल्याचं म्हटलं आहे. मोदींचा अतीआत्मविश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाची डॉमिनेटिंग शैली ही सर्वाधिक जबाबदार आहे. कोरोनाचं संकट असून देखील मोदींच्या प्रशासनाचा प्रयत्न हाच होता की भारतात  पुन्हा सुस्थितीत आणि सारं काही सुरळीत झालं आहे, अशी प्रतिमा तयार केली जावी.”

 

द गार्डियनने ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य  केलं आहे. “भारतात ऑक्सितजनचा मोठा तुटवडा  असताना, लोक ऑक्सिजन अभावी मरत असताना अनेक राजकीय नेते मात्र त्याविषयी आवाज उठवणाऱ्यांवरच दबाव टाकत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन तुटवड्याविषयी आवाज उठवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. कारण त्यांच्यामते ऑक्सिजनचा तुटवडा नाहीच आहे”,  “उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी ऐन  दुसऱ्या लाटेच्या मध्यावर जगातला सर्वात मोठा नदीकिनारी होणारा  कुंभमेळा, भरवण्यास परवानगी दिली. त्यांच्या या निर्णयाला पंतप्रधानांचीही मंजुरी होती”, असं देखील यात म्हटलं आहे.

 

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनाचं हे संकट रोखता आलं असतं, पण तज्ज्ञ म्हणतात त्यांनी ते रोखलं नाही”, अशा शब्दांत सीएनएननं मोदींवर निशाणा साधला आहे. “१७ एप्रिल रोजी भारतात २ लाख ६१ हजार नवे  बाधित सापडले. पण त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड मोठ्या जनसमुदायासमोर निवडणुकीच्या प्रचारसभेत मास्क न घालता सांगत होते की मी एखाद्या सभेमध्ये इतकी गर्दी कधीच पाहिली नाही”, असं या स्तंभात म्हटलं आहे.

 

ब्रिटनच्या फायनान्शियल टाईम्सने छापलेल्या ‘द ट्रॅजेडी ऑफ इंडियाज सेकंड वेव्ह’ या लेखामध्ये तर इशाराच देण्यात आला आहे की, ‘जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी या संकटकाळासाठीची त्यांची जबाबदारी घेत नाहीत, तोपर्यंत देशभर अशाच चिता जळत राहतील. ऑक्सिजनअभावी लोक रुग्णालयाबाहेरच जीव तोडत असल्याची दृश्य ही संकट सुरू झालं तेव्हा वर्तवण्यात आलेल्या भीषण स्वरूपाचंच प्रतिरूप आहे.’

 

फ्रेंच वर्तमानपत्र ला माँडेमध्ये छापून आलेल्या संपादकीयामध्ये मोदींच्या दृरदृष्टीविषयी टिप्पणी करण्यात आली आहे. ‘मोदींच्या दूरदृष्टीचा अभाव, अभिमान या गोष्टी देशात परिस्थिती हाताबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. २०२०मध्ये लॉकडाउन लागू करून पंतप्रधानांनी गरीब आणि स्थलांतरीत मजुरांवर मोठं संकट लादलं होतं. त्याच पंतप्रधानांनी आता आपली सर्वच शस्त्र खाली ठेवली आहेत’, असं यात म्हटलं आहे.

 

टाईम मॅगझिनमध्ये छापून आलेल्या संपादकीयामधून भारतीय प्रसारमाध्यमांवर देखील टीका करण्यात आली आहे. ‘देशातील अनेक हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्या, प्रादेशिक भाषेतील वाहिन्यांनी सातत्याने केंद्र सरकारच्या यशाचं अतिशयोक्तीपूर्ण वृत्तांकन केलं आहे’, असं यात नमूद करण्यात आलं आहे.

 

भारतात काही दिवसांपासून सातत्याने ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी भारताने २४ तासांत जगभरात सर्वाधिक ४ लाख १ हजार रुग्णवाढ नोंदवली आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणांवर ताण येऊ लागला असून रुग्णांवर उपचार होणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं आहे.

 

Protected Content