पाचोरा, नंदू शेलकर । मंगळवार दि. १७ ऑगस्टपासून पंचायत समितीच्या भोंगळ कारभाराची चौकशीच्या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील हे उपोषण करत होते. आज आ. किशोर पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने उपोषणाची सांगता करण्यात आली.
पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचा मनमानी कारभार व तालुक्यातील ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारा विरोधात अनेक वेळा तक्रार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील हे दि. १७ रोजी तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या पहिल्या दिवशी पंचायत समिती गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती सदस्य यांनी आपण दिलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करु असे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र अभय पाटील यांनी त्यांचे तोंडी आश्वासन न मानता उपोषण सुरूच ठेवले होते. अखेर आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी बोलुन याबाबत योग्य मार्ग काढावा असे सांगितल्यानंतर आज दि. २० रोजी उपोषण कर्त्यांच्या सर्व तक्रारींच्या चौकशी करिता एक समिती गठीत करण्यात आली. सर्व प्रकरणांची चौकशी ही पंचायत समिती (चाळीसगाव) चे गट विकास अधिकारी नंदकुमार वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश आल्यानंतर अॅड. अभय पाटील यांनी ते मान्य करत आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते नारळ पाणी घेत उपोषण सोडले.
शासकीय अधिकारी आहेत की भाजपाचे पदाधिकारी : आ. किशोर पाटील
याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी गट विकास अधिकारी अतुल पाटील यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. अतुल पाटील हे शासकीय अधिकारी आहेत की भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यांची देखील चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी अशी मागणी आ. पाटील यांनी केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील यांनी देखील संबधितांची चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशालाही गट विकास अधिकारी अभय पाटील यांनी संबधितांना पाठीशी घालत केराची टोपली दाखवली असा आरोप आ. पाटील यांनी केला. उपोषण सुरु असतांना लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असे आदेश गट विकास अधिकारी अभय पाटील काढत आहेत. ते कोणाच्या आदेशाने चालले आहेत याची प्रथम चौकशी करावी लागेल मत आ. पाटील यांनी पुढे मांडले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार यासर्व प्रकरणांची १५ दिवसांत चौकशी करण्यासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकुमार वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने उपोषण सोडण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहील, पंचायत समिती सभापती वसंतराव गायकवाड, माजी सभापती सुभाष पाटील, जि. प. सदस्य पदमसिंग पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, तालुका अध्यक्ष शरद पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, लोहारा ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, शिंदाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सदाशिव पाटील, उपसरपंच अरमान बेग, प्रभाकर साळुंखे, डिगंबर पाटील , प्रविण ब्राम्हणे उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/2971614876415757