अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील मंगलमूर्ती चौकातून बेकायदेशीर गुरांची वाहतूक करणारे महिंद्रा पिकप वाहन पोलिसांनी ताब्यात घेऊन गुरांची सुटका केली आहे. याबाबत मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अमळनेर शहरातील मंगलमूर्ती चौकातून सोमवारी 6 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता वाहन क्रमांक (एमएच १८ एम ९१५४) जात होता. त्यावेळी वाहनाचे अचानक एक्सल तुटल्याने वाहन जागेवर थांबले होते. दरम्यान अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे रात्रीसाठी गस्तीवर असताना रस्त्यावर बंद पडलेले वाहन दिसले. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता या वाहनांमध्ये गुरे असल्याचा दिसून आले. पोलिसांना पाहून वाहनचालक घटनास्थळाहून पसार झाला. पोलिसांनी धाव घेऊन कोंबून भरलेले गुरांची सुटका करण्यात आले. याबाबत पोलीस कर्मचारी अमोल राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक कैलास पवार करीत आहे.