अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. लाडेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नशीराबाद येथील ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शौचालयाला गेलेली असतांना आरोपी तुकाराम रंगनाथ रंगमले (वय-६०) यांने मुलीला बळजबरी उचलून निर्जळठिकाणी नेवून बलात्कार केल्याची घटना १३ ऑगस्ट २०१८ रोजी घडली होती. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तुकाराम रंगमले यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुरनं ५०/२०१८, भादवी कलम ३७६, ३२३ व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी १४ ऑगस्ट २०१८ रोजी आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास सपोनि आर.टी.धारबळे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर धारबळे यांची बदली झाल्यानंतर सपोनि सचिन बागुल यांच्याकडे देण्यात आला. ९ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.

नऊ साक्षिदार तपासले
सरकार पक्षातर्फे जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.वाय.लाडेकर यांच्याकडे दाखल करण्यात आला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी एकुण नऊ साक्षिदार तपासले. यात पिडीत मुलीचे वडील, पंच नरेंद्र साळुंखे, पिडीता, चेतन धनगर, पो.कॉ. अमोल पाटील, वैद्यकिय अधिकारी दिनेश खेताडे, गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड, सपोनि रंगनाथ धारबळे व सपोनि सचिन बागुल यांचा समावेश होता. यात पिडीत मुलगी, चेतन धनगर आणि वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्ष महत्वपुर्ण ठरल्या. एकत्रित पुराव्याच्या आधारे आरोपी तुकाराम विश्वनाथ रंगमले याला न्यायाधिश पी. वाय.लाडेकर यांनी दोषी ठरवत भादवि ३७६ प्रमाणे आणि लैगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलमाप्रमाणे जन्मठेप व ५ हजार रूपयाचा दंड ठोवला.

दरम्यान, आरोपी गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याला दोषी ठरविल्यानंतर शिक्षा कमी व्हावी अशी मागणी आरोपीने न्यायाधिशांकडे केली. मात्र जिल्हा सरकारी वकीलांनी जोरदार हरकत घेतली. त्यावर आरोपीला जन्मठेप आणि ५ हजार रूपयाचा दंड कायम केला आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके तर आरोपीतर्फे ॲड. संतोष सांगोळकर यांनी काम पाहिले.

Protected Content