शाळांमधून बाजीरावांचा इतिहास शिकवायला हवा ! : शरद पोंक्षे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तब्बल ४२ युध्दांमध्ये अपराजीत राहण्याचा विक्रम करणारे बाजीराव पेशवे यांचा इतिहास शाळांमधून शिकवायला हवा असे प्रतिपादन अभिनेते व लेखक शरद पोंक्षे यांनी केले. ते जळगावातील व्याख्यानात बोलत होते.

याबाबतचे वृत्त असे की, बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे काल छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ‘अपराजित हिंदू योद्धा तथा मराठा साम्राज्य गौरव श्रीमंत बाजीराव पेशवे’ या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ सुशील अत्रे होते. प्रास्ताविक बहुभाषिक ब्राह्मण संघ संस्थापक श्रीकांत खटोड यांनी केले. यात त्यांनी बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या आजच्या वाटचालीचा आढावा प्रस्तुत केला.

यानंतर शरद पोंक्षे यांनी पहिले बाजीराव पेशवे यांच्या तेजस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला ते म्हणाले की, राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी इतिहास बदलला. पेशवा बाजीराव यांनी आपल्या कारकीर्दीत ४२ अपराजित लढाया लढल्या व जिंकल्या. यामुळे त्यांचा खरा इतिहास शाळांमधून शिकवायला हवा. मुस्लिमांच्या आक्रमणाला साडेचारशे वर्षांनंतर शिवरायांनी थोपवायला सुरुवात केली. पुढे बाजीराव पेशवे यांनी ही धुरा आपल्या हाती घेतली. शिवरायांप्रमाणेच त्यांना आपल्या सैनिकांची सुख-दु:ख माहित असल्याने ते त्यांच्यात एकरूप झाले होते. त्यांनी ४० वर्षांच्या काळात ४२ अपराजित लढाया लढल्या. त्यामुळे आज भारतीय मुलांना बाजीराव शिकवणे गरजेचे असल्याचे पोंक्षे यांनी नमूद केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक अजित नांदेडकर तसेच महिला मंडळ अध्यक्षा मनीषा दायमा यांच्यासह बहुभाषिक ब्राह्मण संघाचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content