अलमट्टी धरणाच्या आधी वादाचीही उंची वाढणार !

सांगली वृत्तसंस्था । अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी केले आहे.

या धरणाची उंची वाढवण्यासाठी महाराष्ट्राने यापूर्वीच विरोध दर्शवला आहे. याशिवाय सुप्रीम कोर्टाने उंची वाढवण्यास परवानगी दिलेली नाही. यानंतरही कर्नाटक सरकारकडून अलमट्टीची उंची वाढवण्याचा घाट घातला जात असल्याने यावरून पुन्हा दोन्ही राज्यात वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सांगलीपासून १३४ किलोमीटर अंतरावर कर्नाटकातील विजापूर आणि बागलकोट या दोन जिल्ह्यात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. या धरणाचे काम २००५ मध्ये पूर्ण झाल्यानंतर त्याचवर्षी महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागला. यानंतर सातत्याने दक्षिण महाराष्ट्रातील पुराचा ठपका अलमट्टी धरणावर ठेवला जात आहे.

सध्या धरणाच्या भिंतीची उंची ५१९ मीटर आहे, तर १२३ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे. धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढवण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू आहेत. मात्र, उंची वाढवल्याने याचा मोठा फटका सांगलीपर्यंतच्या गावांना बसू शकतो. याशिवाय पावसाळ्यात गंभीर पूरस्थिती उद्भवू शकते, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे

Protected Content