जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये भुसावळातील तब्बल २५० संशयितांचा कोरोना अहवाल हा निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. तर एक जण मात्र कोरोना बाधीत आढळून आला आहे.
परवा रात्रीपासून कोरोनाच्या स्टेटसबाबत माहिती प्राप्त झाली नव्हती. या पार्श्वभूमिवर, आज सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने एका प्रेस नोटच्या माध्यमातून ताजी माहिती जारी केली आहे. यानुसार-भुसावळ येथील गंगाराम प्लाॅट, प्रोफेसर काॅलनी, शनी मंदिर, रामदासवाडी व इतर ठिकाणच्या 251 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 250 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एका 30 वर्षीय डाॅक्टरचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 382 झाली आहे.
दोन दिवसांपासून कोरोनाचे रिपार्ट न आल्याने अनेकांचे श्वास टांगणीला लागले होते. यात कोरोना बाधीतांच्या आप्तांसह त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा समावेश होता. यामुळे फक्त एक रूग्ण पॉझिटीव्ह आला असून तब्बल अडीचशे रूग्ण निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आज निगेटीव्ह आलेले सर्व संशयित हे भुसावळातील आहेत. मध्यंतरी भुसावळ शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. आता अडीचशे रूग्ण निगेटीव्ह आल्याने भुसावळकरांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. तर शहरातील एक रूग्ण हा पॉझिटीव्ह आढळून आला असून तो व्यवसायाने डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी दिली आहे.