नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील. मग ती हॉस्पिटल्स सरकारी असो की खासगी असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दिल्लीतील केंद्र सरकारच्या हॉस्पिटल्यमध्ये मात्र कुणीही उपचार घेऊ शकतं, असं केजरीवाल म्हणाले होते. दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०-१० हजार खाटांची व्यवस्था आहे. त्यातील केंद्र सरकारची रुग्णालये बाहेरच्या रुग्णांसाठी खुली असतील. दिल्ली सरकारने त्यावर पाच तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती आणि नागरिकांचा कौलही घेतला होता. जूनअखेर दिल्लीत करोनारुग्णांसाठी १५ हजार खाटांची आवश्यकता भासणार असून, दिल्लीबाहेरच्या रुग्णांसाठी रुग्णालये खुली केल्यास नऊ हजार खाटा तीन दिवसांतच भरल्या जातील, असा अहवाल या तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे.